Monday 2 October 2023

सुधारस


सौ. सुधा गणेश सोवनी 
त्यांना मी जेव्हा प्रथम भेटले तेव्हाच त्यांचा प्रेमात पडले.
 आणि आमचे हे प्रेमाचे सुंदर नाते बघता बघता सव्वीस वर्षांचे झाले. सुंदर, गोऱ्या, उंच आणि भारदस्त व्यक्तिमत्व लाभलेल्या सौ. सुधा गणेश सोवनी म्हणजे माझ्या सासूबाई उर्फ माझ्या मावशी उर्फ इतर सर्वांसाठी  मामी.

अत्यंत सालस, भोळ्या पण प्रसंगी ठाम निर्णय घेणाऱ्या, दूरदर्शी, कोणत्याही प्रसंगात न डगमगणा-या, अत्यंत बुद्धिमान, आधुनिक विचारांच्या आणि निर्मळ मनाच्या आशा माझ्या मावशी हे एक  अत्यंत दुर्मिळ व्यक्तिमत्व. पटकन साऱ्यांना आपलेसे करणाऱ्या, निर्मळ स्वभावाच्या, अचूक निर्णय घेणाऱ्या कधीच कोणाला न दुखावणाऱ्या, आयुष्यात कधीच वावगा, शब्द न काढणाऱ्या, संसारात राहूनही ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान हा अभंग शब्दश: जगू शकलेल्या आशा होत्या माझ्या सासूबाई.  

तेव्हा मी आणि चंदन एकाच कंपनीत काम करायचो. मी हॉस्टेल वर राहायचे आणि चंदन पक्का पुणेकर. त्यामुळे साहजीकच त्यांच्या घरी येणे जाणे सुरू झाले. आणि मग माझी मावशींबरोबर  बघता बघता गट्टी जमली. त्या आणि माझे दादा (वडील) यांच्या मुळेच मग माझी आणि चंदनची  कभी हा कभी ना वाली मैत्री विवाहात परावर्तीत झाली. आणि मग माझा सुरू झाला मावशीमय होण्याचा प्रवास.

त्यांच्या कडे एक अत्यंत सकारात्मक ऊर्जा होती त्यामुळे मग कितीही नाठाळ मनुष्य त्यांच्या 

प्रवास जीव की प्राण 

सहवासात येऊन काही वेळ का होईना सात्विक व्हायचा. मी तर काय त्यांच्या अखंड सहवासात  होते. त्यामुळे मग आई दादांनी हात टेकलेली ही दांडेकरांची अवखळ कन्या 😛सोवनींची  सून झाल्यावर सुतासारखी सरळ झाली.
 

सकाळचा चहा सोबत घेतल्या शिवाय आमचा दिवस कधीच सुरू झाला नाही आणि ऑफिस मधून आल्यावर त्यांना दिवसभरातील घडामोडी सांगितल्याशिवाय एक दिवसही सरला  नाही.

तेव्हा आम्ही मॉडेल कॉलनीत राहायचो. थोड्याच काळात त्यांच्या ध्यानात आले की ही मुलगी आता आयुष्य भर काही आपला पदर सोडत नाही. मग आम्ही लॉ कॉलेज रोड च्या प्रशस्त सदनिकेत  राहायला आलो आणि तिथेच तब्बल 26 वर्षे राहिलो. या काळात अनेक स्थित्यंतरे आली आमच्या आयुष्यात पण त्यांनी आमच्यावर धरलेले मायेचे छत्र कधीच ढळू  दिले नाही.

आमच्या लग्नाआधीच त्या ट्रेझरी ऑफिसर म्हणून निवृत्त झाल्या होत्या. त्यांच्या काळात जेव्हा स्त्री चूल आणि मूल या पलीकडे विचार करू शकत नव्हती तेव्हा त्या एक अत्यंत यशस्वी  शासकीय अधिकारी होत्या आणि तितक्याच सफल गृहिणी, माता आणि पत्नी आणि नंतर सासूबाई देखील.

निवृत्ती नंतर, प्रवास केला, आध्यात्मिक वाचन मनन केले, ज्योतिष शिकल्या आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सुनेला वळण लावले  आणि नातवंडांना  सुजाण नागरिक बनवले. जे जे त्यांच्या आयुष्यात आले त्यांना आपल्या व्यक्तिमत्वाच्या प्रभावाने मंत्रमुग्ध केले.

माझ्या साठी तर त्या friend-philosopher-guide होत्या. मी आपली त्यांच्या कडे, मुले अभ्यास करत नाहीत इथपासून ते माझ्या क्लाएन्टने माझे कसे पैसे बुडवले इथपर्यन्त वाटेल त्या समस्या घेऊन जायचे. आणि त्या अगदी शांत पणे, अग करेल तो अभ्यास, काळजी करू नको, असे समजावण्या पासून ते  उद्या मी येते तुझ्या बरोबर कसे मिळत नाहीत पैसे तुझ्या क्लाएन्ट कडून  ते बघू आपण असे सांगून धीर देण्यापर्यंत सगळे तोडगे अगदी सहज सांगायच्या.

दुपारी हमखास फोन करून उगाचच विचारायच्या, अग रात्रीला काय स्वयंपाक करूया? आणि मग मी मीटिंग मध्ये असल्याचे सांगितल्यावर बर मी बघते म्हणायच्या. गेले नऊ महीने रोज मी या एका फोन ची वाट बघतेय माहीत असून देखील की आता असा फोन कधीच येणार नाहीये.

चंदन त्यांचे शेंडेफळ. अत्यंत लाडका. आमच्या लग्नानंतर अगदी नकळत त्यांनी स्वतःला अलिप्त करत आमच्या सांसाराला खत पाणी घातले आणि आमच्या मागे खंबीर पणे उभ्या राहिल्या. पण त्यांनी आमच्यावर फक्त ऊन्हाचे चटके बसणार नाहीत एव्हढीच सावली धरली. नाजुक रोपट्याचे वृक्षात रूपांतर होईल याची काळजी घेतली, आमच्या  नकळत.

आमची सासू सुनेची जोडीच आगळी वेगळी. खरेदी साडीची असो नाहीतर गाडीची, आम्ही तितक्याच उत्साहाने करायचो. दहा दहा हजारांची पुस्तके आणून येईल जाईल त्याला वाटत बसायचो, मार्केट यार्डात जाऊन किलो वारी फुले आणि भाजी आणायचो. आणि एकदा हा हावरटपणा करून झाला की नामा निराळ्या झालेल्या सुनेकडे कानाडोळा करून त्या भाज्या फळांची उस्तवार करत बसायच्या.  सारे काही बिनबोभाट.

त्यांचे धार्मिक आचार देखील खूप अनवट. दरवर्षी पितृ पक्षात साधारण 40 नैवेद्य केले जायचे. हे नैवेद्य नातेवाईक, मित्र मंडळी, सगे सोयरे यांच्या बरोबरच अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या नावाने वाढले जायचे अत्यंत भावुक पणे. इतके सारे त्या करायच्या पण एका शब्दाने देखील त्या कधी म्हणाल्या नाहीत की हे सारे तूला पुढे करायचे आहे म्हणून.

आमचे कुटुंब 

त्यांचे व्यक्तिमत्व हा एक सुरेख विरोधाभास होता. हळव्या आणि  धैर्यशील, कलासक्त आणि विज्ञाननिष्ठ, प्रवास आणि आवासावर समरसून प्रेम करणाऱ्या, उत्तम अधिकारी आणि उत्तम गृहिणी. उत्तम आई आणि आदर्श सासूबाई. पण सर्वात महत्वाचे म्हणजे एक अत्यंत समृद्ध आणि निर्मळ व्यक्ती.

ऑक्टोबर 2022 ला त्यांना कर्क रोगाने ग्रासले. पण कोणताही त्रागा न करता त्या आजाराला सामोऱ्या गेल्या. शेवट पर्यन्त स्वावलंबी होत्या. शेवटच्या आठवड्यापर्यन्त संध्याकाळी घरी आल्यावर कशा आहात असे विचारले की “उत्तम” म्हणायच्या. आणि सकाळी साडी नेसून कामावर निघाले की प्रसन्न हसून छान दिसतेस म्हणायच्या. अत्यंत स्थितप्रज्ञपणे सर्व वेदनांना हसत मुखाने कवेत घेऊन शांतपणे त्यांनी आपली जीवन यात्रा संपवली.

सुमधुर वाणीचा, सात्विक व्यक्तिमत्वाचा, प्रसन्न हास्याचा, प्रगल्भ विचारांचा हा अलौकिक सुधारस मात्र आम्हा सर्वांसाठी त्या सोडून गेल्या. हा अक्षय सुधारस त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला मिळालाय. न मागता सवरता.

Friday 1 October 2021

रेशमाची आज्जी

 

हीराबाई दत्ताराम जोशी 
रेशमाची आज्जी 
बेळगावला असताना मी रेशमाच्या घरी जवळजवळ रोजच जायचे. म्हणजे तिच्या कडे पडीकच असायचे म्हणा ना. आमची घरे टिळक वाडीत अगदी जवळ होती म्हणून आणि माझ्या पालकांना वाटायच की मी थोडी तरी चांगल्या संगती मुळे सुधारेन. 😁

कॉलेजचे ते रंगीबेरंगी दिवस तर होतेच पण अनेक नव नवीन अनुभव घेण्याचे ही होते. माझ्या त्या कोवळ्या संवेदनशील वयात ज्या काही व्यक्ति मला भेटल्या त्यांची प्रतिमा आज देखील माझ्या मनात ताजी आहे. लहान पणा पासून माझी आज्जीच्या नात्याची संकल्पना दृढ होत गेली ती गोष्टीची पुस्तके वाचून. मला नेहमी वाटायचे आपल्या घरात आपल्या बरोबर रोज राहणारी आपली प्रेमळ आजी पाहिजे बुवा. माझ्या दोन्ही मोठयाई (आजी) दूर राहायच्या त्यामुळे त्यांचा रोज सहवास अशक्यच. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव माझ्यावर पडत गेलाच. पण मला अगदी गोष्टीत वाचल्या सारखी सतत आपल्या घरात राहणारी प्रेमळ आजी प्रथम भेटली ती रेशमाच्या घरी.

माझी रेशमाची नवीन नवीन ओळख झाली ती कॉलेज मधे.  मग कधी तरी मी तिच्या घरी जायला लागले. तिचे वडील बेळगाव मधील सुप्रसिद्ध सर्जन. त्या मुळे थोडी बिचकतच मी तिच्या घरात गेले. काकूंनी मला बसायला सांगितले आणि त्या रेशमाला बोलवायला गेल्या. समोर एक साठीच्या सूती नऊवारी साडी नेसलेल्या बाई बसल्या होत्या. बहुधा रेशमाच्या ड्रेस ला बटण लावत असाव्यात. आणि त्याच क्षणी मला ती गोष्टीच्या पुस्तकातली प्रेमळ आजी भेटली. रेशमाची आजी.

आणि मग ती मला परत परत भेटत गेली विविध प्रसंगी, विविध वेळी,  पण नेहमीच त्या प्रेमळ प्रसन्न हसतमुख आविर्भावात.

माझ्या आयुष्यात आजवर पाहिलेली  ही  एक अत्यंत प्रसन्न व्यक्ती. सुंदर गोरा हसतमुख चेहरा. धारदार नाक, मोठे गोल कुंकू, बांधेसुद उंच अंगकाठी आणि प्रसन्न हास्य सतत ओठांवर पसरलेले.  घरंदाज  आणि अत्यंत सोज्वळ व्यक्तिमत्व, प्रेमळ डोळे आणि सारस्वती कोंकणी ढंगाची मधुर वाणी. माझ रेशमाशी चांगल जमायच (म्हणजे ती माझ्याशी जमवून घ्यायची)😀 म्हणून तर मी तिच्या कडे जायचेच पण त्या बरोबर तिच्या आजीला भेटायची एक अनामिक ओढ मला लागलेली असायची. आणि एखाद्या दिवशी जर नाही भेट झाली तर मन खट्टू व्हायच.

रेशमा त्यांना बिनधास्त आपल्या ड्रेस ला बटण लाव वगैरे सांगून मोकळी व्हायची तेव्हा तर मला तिचा हेवाच वाटायचा. त्यात वर कधी कधी तिची आजी तिला आपण होऊन काही तरी मदत करायची तेव्हा तर मनोमन वाटायच एक दिवस या आजीला आपण हायजॅक करायचच.

परीक्षा जवळ आली की मी रोजच रेशमाच्या घरी जाऊ लागायचे. आम्ही एकत्र अभ्यास करायचो. कधी

आजीचा लाडोबा 

तरी लवकर गेले तर त्यांची नुकतीच जेवणं उरकलेली असायची. मग आई आणि आजीची टेबल रिकाम करण्याची लगबग सुरू व्हायची. जेवणात त्या दिवशी मासे असले तर विशेषच गडबड व्हायची त्यांची. मला खूप दिवस प्रश्न पडायचा या इतक्या गडबडीने टेबल का रिकामे करतात? मग समजले, मला उगाच मशाच्या वासाचा त्रास होऊ नये म्हणून ही खटपट. इतकी छोटीशी बाब पण एखाद्याचा इतका विचार करण्याचा मोठेपणा. कधी तरी त्या मला गंमतीने “तुम्ही भट, तुला उगाच माशाचा वास देखील नको यायला” असे म्हणायच्या तेव्हा तर मला खूप गंमत वाटायची. त्यांच्या तोंडून ते कोंकणी ढंगाने तुम्ही भट असे ऐकणे देखील खूप छान वाटायचे.

रेशमा लग्न होऊन लंडन ला गेली. आणि मी धारवाडला पुढील शिक्षणा साठी गेले. मग बेळगावाला गेले की कधीतरी रेशमाच्या घरी चक्कर मारायचे. पण त्यांना मी कधीच सांगू शकले नाही की त्या माझ्या रोल मॉडेल आजी होत्या. गोष्टीच्या पुस्तकांतून थेट खऱ्या खऱ्या झालेल्या.

माझे लग्न ठरल्याचे कळल्यावर त्या काकूं बरोबर माझ्या सासरच्यांना भेटायला आल्या होत्या. अत्यंत आनंद झाला होता त्यांना. त्यांच्या डोळ्यातलं ते कौतुक बघून मी अगदी तृप्त झाले त्या दिवशी. रेशमा इतकीच त्यांना माझी काळजी आणि कौतुक होते हे बघून भरूनच आले मला.

जेव्हा मी रेशमाच्या आजीला प्रथम भेटले तेव्हाच मी एक स्वप्न पाहिल होत. माझ्या मुलांना सुद्धा अशीच आजी मिळाली पाहिजे, प्रेमळ, शांत, मृदु स्वभावाची. त्यांचे लाड करणारी. त्यांच्या ड्रेस ला बटण लाऊन देणारी,  त्यांच्यावर मायेची पाखर घालणारी. आणि माझ्या नशिबाने मला असच घर मिळाल. माझ्या मुलांना अशीच आज्जी मिळाली आणि त्यांना आजीचा अखंड सहवास आजही मिळतो आहे.

आज रेशमाची आजी या जगात नाही. मला त्यांच्या बद्दलच्या माझ्या भावना त्यांच्या समोर कधीच व्यक्त करता आल्या नाहीत. पण त्यांच्या  आशीर्वादाने माझे स्वप्न मात्र पूर्ण झाले आहे.  माझ्या मुलांच्या आजीच्या रूपाने. आज रेशमाची आजी माझ्या मुलांकडे  पण आहे........

Monday 7 September 2020

वृंदावन

 

सौ. वृंदा दत्तात्रय दांडेकर
आज देखील  तिचा चेहरा डोळ्यासमोर आला की तिचं ते      प्राजक्ताच्या  सड्या सारखं प्रसन्न हास्यच डोळ्यासमोर येत. चार फूट अकरा इच उंची. गोल गुलाबी चेहरा सरळ नाक आणि निळसर झाक असलेले राखाडी डोळे. दांडेकरांची वृंदा. म्हणजेच माझी आई. बरीच वर्ष लोटली तिला देवा घरी जाऊन. पण आम्ही भावंडेच नाही तर तिच्या संपर्कात आलेली मंडळी देखील राहून राहून म्हणतात, “तिच्या सारखी तीच.”

 पनवेलच्या भाटे कुटुंबात अत्यंत लाडाकोडात वाढलेली मंदाकिनी पालघरच्या प्रतिष्ठित घराण्यातली मोठी सून म्हणून वाजत गाजत आली आणि मग, ती प्रतिष्ठा सांभाळत आणि आपल्या माहेरच्या मध्यम वर्गीय संस्कारांची शिदोरी वापरत आपलं एक स्थान निर्माण करून गेली.

 

अत्यंत प्रेमळ पण शिस्तप्रिय, साधी पण नीटनेटकी,  सुशील-सुगरण-स्वावलंबी-स्वाभिमानी अशी ही आमची आई. अगदी चार चौघींसारखी संसारी स्त्री. तुमची आमची सगळ्यांची असते तशीच आई.. पण तरीही खूप वेगळी.

आज ती आम्हा भावंडांना अनेक रुपात आठवते. स्वयंपाक घरात असताना अगस्तीच्या
फुलांची भाजी देखील अत्यंत रुचकर बनवणारी अन्नपूर्णा. त्या वाडीतल्या एकाकी घरात



रहात असताना खिडकीतून बंदूक काढून मांडवात आलेल्या कोल्ह्याना पळवून लावणारी रणरागिणी, शेताची अत्यंत काळजीने निगा राखणारी प्रयोगशील शेतकरी, आमच्या हातून खेळताना ट्यूब फुटली असता न रागावता सा-या काचा बाजूला करून आत काय असते ते समजावून सांगणारी वैज्ञानिक, "पानात वाढलेलं निमूट पणे खा" किंवा "एक वेळ फाटका कपडा घातलास तरी चालेल पण मळका नाही घालायचा" असे धमकावणारी दुर्गा माता. बाहुलीच्या लग्नात आमच्या बरोबरीने रमणारी नीज शैशवास जपणारी बालिका.  किती तरी रूपे या एका व्यक्तीत सामावलेली.

आपली मुले अत्यंत छोट्या गावात राहतात पण उद्या ती मोठी होतील आणि तेव्हा ती बावचळून जातील म्हणून पदर मोड करून वर्षातून एकदा आम्हाला मुंबई च्या posh उपहारगृहात घेऊन जाणारी आणि तेथे फोर्क ने डोसा कसा खायचा याचे धडे देणारी personality groomer.

सुंदर माझं घर आवडीने बघणारी सुगृहिणी आणि आमची माती आमची माणसं तितक्याच आत्मीयतेने पाहणारी प्रतिथयश शेतकरीण.

दादांच्या प्रतिष्ठेसाठी दोन डझन कलाकारांची जेवणाची सोय दुसरी कडे कुठे होत नाही हे कळल्यावर सा-यांच्या जेवणाची सोय करणारी सहधर्मचारिणी, जणू तिला द्रौपदीची थाळीच प्राप्त झाली होती.

आणि या बरोबरच कितीही मोठे कलाकार किंवा सुप्रसिद्ध व्यक्ती (अगदी पोन्डिचेरीचे तत्कालीन राज्यपाल का असेनात) घरी आले तर या घरात मद्यपान अथवा धुम्रपान करतायेणार नाही असे परखडपणे सांगून वास्तूचे पावित्र्य राखणारी तत्वनिष्ठ आर्या.

प्रवास म्हणजे जीव की प्राण, मग तो बजाज च्या स्कूटर वरून असो नाही तर विमानातून

विहिणी बरोबर फुगडी

तितक्याच उत्साहाने फिरायला
निघणारी पर्यटन प्रेमी भटकंती वीर.

 

परमेश्वरावर श्रद्धा असणारी, पूजा अर्चा करणारी, एक हजार वेळा शिव शंभो कैलासपते... भक्ती भावाने लिहिणारी.. शिव भक्त ..

परंतु माणसाची क्रिया कर्म करण्यापेक्षा तो असताना काय ते करा असे ठाम पणे सांगण्या इतकी स्वतंत्र विचाराची स्वतंत्र स्त्री.

अजितने एखादे इलेक्ट्रॉनिक उपकरण नीट केल्यावर अत्यंत आनंदित होणारी ... नवीन टेकनॉलॉजि बद्दल अतीव आत्मीयता असणारी .. तंत्र प्रेमी....

अनेक श्लोक, आरत्या मुखोद्गत असणारी आणि त्याच बरोबर जुनी  कुणालाच अवगत नसलेली  हिंदी-मराठी गाणी म्हणून भेंड्या चढवणारी संगीत प्रेमी...

अनेक नातेवाइकानी वाळीत टाकूनही त्यांना थोडी उपरती झाल्यावर माफ करणारी क्षमाशील स्त्री..


ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत, सुप्रसिद्ध गायिका जानकी अय्यर यांसारख्या व्यक्ती तिला भेटायला आणि तिच्याशी गप्पा मारायला आवर्जून घरी यायच्या. समोरच्या बंगल्यात राहणाऱ्या निवृत्त न्याशाधीश अक्का कुलकर्णी तर रोजच येऊन बसायच्या.  त्यांच्याशी बोलून (म्हणजे बहुधा त्याचे ऐकून)  आणि त्यांना नाविन्यपूर्ण पदार्थ खिलवून तृप्त करणारी चांगली listener अशी आमची आई.

तिला कवयित्री इंदिरा संत (अक्का ) दांडेकरांची तुळस असेच म्हणायच्या.

होतीच तशी ती, पवित्र मनाची,  सुगंधी तनाची, औषधी विचारांची आणि अमोघ आत्मीय मनोबल लाभलेली, साधी सुधी, एका जागी निश्चल राहून आम्हा सा-यांना सतत आशीर्वचन देणारी तुलसी माता. 

 

    अनघा जोशी            अश्विनी सोवनी           अजित दांडेकर

 

Monday 31 August 2020

वेड्या रविवारची कहाणी

 

मै और मेरी तनहाई 

लॉक डाऊन ची मरगळ जरा कमी होतेय. आम्हाला  रिकामपणचे उद्योग सुरु करण्याचे वेध लागतायत. एकदा तो करोना हद्द पार झाला की कुठे कुठे ट्रेकिंग ला जायचं या बद्दल गप्पा झडतायत. आणि माझी मात्र सायकलिंगची ओढ अनावर होतेय. मी सगळ्यांना सारखी समजावते की सद्य परिस्थितीत सायकल प्रवास हाच सर्वोत्तम पर्याय आहे.

आमच्या सायकल वाऱ्या सुरु झाल्या देखील. मग दर शनिवारी पुण्याच्या सर्व दिशा धुंडाळून होतात. मागचा रविवार मात्र थोडा वेगळा.

अनिरुद्ध आणि हेमंत बरोबर ठरलेले सर्व बेत ऐनवेळी रद्द होतात पण माझे हट्टी मन अजिबात माघार घेऊ इच्छित नाही.  मी उद्या एकटीच सायकलिंगला जाणार असल्याची घोषणा करते. इतक्या वर्षाच्या अनुभवाने चंदनने माझ्या नादी लागणे सोडून दिलेय त्यामुळे तो मूक पाठींबा दर्शवतो.

२०१४ साल पर्यंत केलेल्या सोलो सायकलिंग चा अनुभव गाठीशी असतोच.  रविवारी सकाळी ५.३० वाजता मी सायकल वर saddle bag लावते आणि मार्गस्थ होते. निर्मनुष्य रस्त्यावरून दोन चाके संथ गतीने धावू लागतात आणि माझे मन मात्र वायू वेगाने पुढे धावू लागते. 

वाघोलीचा वाघेश्वर

    आता माझा माझ्याशी संवाद सुरु होतो. सोलो सायकलिंगचा हा     पहिला एक तास मला खूप आवडतो. या तासात आधी मन        संभ्रमित असतं. थोडी हुरहूर असते. त्या एकटेपणाची अजून        सवय होत असते. थोडी मजा वाटते आणि ग्रुप सायकलिंगची        धमाल आठवून जरा कससही वाटते.  यातच कुठे तरी आपला        आपल्याशी संवाद सुरु होतो. विचारांचा गुंता सुटायला लागतो        आणि आपल्या विचारांना आपल्या मनात शिरायला जरा वाव        मिळू लागतो.

“अरेच्चा इतके काही वाईट नाही आपले मन. बरे आहे की. जमतंय की आपल्याला थोडा अंतरंगाशी संवाद साधायला.” असे म्हणे म्हणे पर्यंत वाघोलीच्या वाघेश्वर मंदिरा पर्यंत मी पोचते देखील. आज फोटो काढायला कोणी नाही मग मी मोबाईल काढून त्यात एक सेल्फी क्लिक करून टाकते. वर एक व्हिडीओ पण शूट करते.  प्रूफ हवेच हो सगळ्याचे. माझी black beauty आपली गप गुमान उभी. 

रस्ता अगदी सरळ सोट आणि माझा उत्साह शिगेला पोचलेला त्या मुळे वडू फाटा येतो देखील. आत वळल्यावर मात्र न

Black Beauty

राहवून मी एका हाताने handle धरून  दुसर्या हाताने मोबाईल मध्ये व्हिडिओ घेते. मेरा भारत महान वगैरे घिसे पिटे संवाद बरळून झाल्यावर माझे समाधान होते. आज असले अघोरी प्रकार करण्या पासून थांबवायला चंदन नाही. पण त्याला आठवून मीच हे चाळे बंद करते. इतक्यात एक माणूस दिसतो. बऱ्याच वेळात कुणाशी बोलता आलं नाही म्हणून की काय, मी त्याला विचारते, वडू चा रस्ता हाच का हो भाऊ? भाऊ साहेब मला उत्साहानी माहिती देतात, या बाजूला वडू खुर्द, आणि त्या बाजूला  बुद्रुक. तुम्हाला कुठे जायचंय. मी प्रांजळ पणे सांगते, तसं काही नाही, कुठलंही चालतंय की. भाऊ साहेब shocks and अश्विनी rocks. पण मी तरी काय करू. माझ खरच काही ठरलेलं नसत त्या वेळी. मग मी ठरवते आधी खुर्द आणि मग बुद्रुक.

त्या टुमदार गावाचा रस्ता नदीच्या घाटा पाशी संपतो. मग माझे पुन्हा एकदा मोबाईल मध्ये बरळून होते. दात काढून सेल्फी होतो. पोटपूजा होते, सायकल चे फोटो काढून होतात तरी भरपूर वेळ उरतो.  मग मी उगाचच त्या संथ वाहणा-या भीमा माई कडे बघत बसते. याच तीरावर, कधी तरी छत्रपती संभाजी महाराज वावरले असतील अशा विचारांनी मन भरून येते.

त्या निर्मनुष्य घाटावरून मन निघत नाही आणि पाय थांबत नाहीत. तेव्हढ्यात घरी फोन करायचा होता याची आठवण होते. पटकन एका वाक्यात मी कुठे आहे हे सांगून फोन बंद. त्या निरव शांततेत इतकेही बोलण्याची इच्छाच होत नाही.

परत हमरस्त्याला लागल्यावर अचानक संभाजी महाराजांच्या समाधी कडे अशी पाटी दिसते आणि मी बुद्रुक वगैरे विसरून मातीच्या रस्त्याला लागते. शेताच्या कडे कडेनी हा नयनरम्य रस्ता मला परत नदी काठी घेऊन जातो. आणि पाहाते तर काय एक प्राचीन कठडे विरहित पूल समोर उभा ठाकतो. त्या ब्रिज वर सायकल दामटवून पलीकडच्या तीराला लागते सुधा. त्यात मोबाईल वरून एक व्हिडीओ काढण्याचा अचरटपणा करून होतोच.



            
माझा पण फोटू
    
    नदीचा धीरगंभीर आवाज माझ्या चंचल मनाला आवर घालतो. थोडा वेळ मन स्थिर झाल्यावर त्या     अनाम स्थळावरून मी गाशा गुंडाळते. Finally कोरेगाव भीमा येत आणि मी नगरच्या दिशेने         सायकल हाकू लागते. आता मला केळी दिसतात. मग उगाचच थांबून केळी घेते. केळ हे             निमित्त मात्र, खर तर माणसाशी बोलायची ओढ. मग दादाला उगाचच पुढचे गाव किती दूर आहे      वगैरे  विचारून होते.

  आता सणसवाडी आली. इतक्यात फोन वाजतो. दादांचा (वडिलांचा) फोन. त्याना मी सायकलिंग ला     गेलेय हे एव्हाना कळलेलं असतं. सोशल मीडियाची ऐशी की तैशी. मग मी थांबून गप्पा मारून      घेते. गोल्डा     मायर, इझराइलची स्थापना, जडण घडण आणि असेच इतरांना वायफळ वाटेल असे काहीही. मग मला आठवते की मी सोलो सायकलिंगला आलेय. मी तसे सांगून फोन बंद करते. सणस वाडी तून माझे मन खरे तर रांजणगाव कडे  धाव घेतेय. पण आता मन भरलंय आणि पाय भरून  येतायत.  

किती तरी वर्षांनी असा निवांत एकांत मिळाला. अंतरंगाशी दोस्ती करायला उसंत मिळाली. संवाद न साधल्या मुळे मनात निर्माण झालेले वितंड वाद मिटले.

Aimless भटकून झालं, fearless व्हिडीओ काढून झाले, चिखलाच्या रस्त्यावरून सायकल दामटवून झाली. निर्मनुष्य घाटावर स्वतःलाच सोबत करून झाली, उतारावर सुसाट सायकल हाणून झाली, तोंडावर येणा-या वारयाची स्पर्धा करून झाली. आता काही म्हणजे काही करायचं राहिलं नाही अस लक्षात आल्या वर मी निमूटपणे घरात शिरते. परत तेच शहाण आयुष्य जगायला. पण आता त्या शहाण्या आयुष्याची पर्वा नाही. माझ्या वेड्या मनाशी दोस्ती करून आलेय ना मी आज.

शुद्धी महत्वाची तनाची आणि मनाचीही............

सुधारस

सौ. सुधा गणेश सोवनी  त्यांना मी जेव्हा प्रथम भेटले तेव्हाच त्यांचा प्रेमात पडले.  आणि आमचे हे प्रेमाचे सुंदर नाते बघता बघता सव्वीस वर्षांचे...