मैलाचा दगड नाशिक फक्त दहा |
सायकली तयार झाल्या,
मार्गावरील टप्पे ठरले आणि वाटेत मदत लागली तर म्हणून टेम्पो देखील निश्चित केला.
काही गळाले आणि काही मिळाले असे करत आमचा
आठ जणांचा कंपू तयार झाला देखील.
सुरुवातीचा एक क्षण |
१० नोव्हेंबरची पहाट उजाडली आणि चंदनचा फोन किणकिणला. सचीनने सेल्फी
टाकून आपण उठल्याचा पुरावा दिला होता. चला सुरुवात तर चांगली झाली असे म्हणत आम्ही
पहाटे साडेचार वाजता फर्ग्युसन रस्त्यावर जमलो देखील. सुरुवातीची सायकलींची किरकोळ
जुळवाजुळव झाल्यावर आमचे पाय पेडल वर स्थिरावले आणि चाके फिरू लागली. मुंबई पुणे
रस्त्यावर सचिनची आरोळी ऐकल्यावर हायसे वाटले. तो टेम्पोत सायकल टाकून खुशाल बसला
होता. आम्हाला पाहिल्यावर त्याने सायकल उतरवली आणि आमची सफर ख-या अर्थाने सुरु
झाली. बघता बघता नाशिक फाटा आला आणि गेला. आम्ही चाकणला कधी पोचलो ते कळले देखील
नाही. काही वेळात तिमिराचे साम्राज्य संपून सा-या दिशा उजळल्या. आमचा वेग वाढला
आणि उत्साह देखील द्विगुणीत झाला. थोड्याच वेळात अवसरीच्या घाटात आम्ही सायकली
दामटवू लागलो. अतिशय मोहक सकाळ होती ती. उन्हाच्या आत घाटमाथा सर केल्यामुळे विशेष
खुशीत येऊन आम्ही उदरभरणाची सोय केली.
एव्हाना आम्हाला
मोठ्या चौपदरी रस्त्याची सवय होऊ लागली होती. डोंगरमाथ्यावरचा गार वारा खाऊन मने
सुखावली होती. इतक्यात परत अचानक छोट्या दुपदरी रस्त्यावर आम्ही फेकले गेलो.
शार्दुल आणि द्रुमिल अगदी सहजपणे सगळ्यांच्या पुढे सायकल दामटवत होते. या तरुणाईचा जोश पाहून आमच्या सायकली
देखील आपोपाप गतिमान होत होत्या. आता मागील वाहनांची वर्दळ जाणवू लागली होती. मी मागचे
दिसण्यासाठी लावलेल्या आरशात पहात सावधपणे सायकल हाकत होते. माझ्या मागे अगदी कोरी
करकरीत चासी घेऊन एक ट्रक चालक येत होता. मी थोडी बाजूला सरकण्याचा निष्फळ प्रयत्न
केला पण माझ्या ध्यानात आले की त्या ट्रक चालकाला अजिबात घाई नाहीये तो माझ्या
मागून अगदी सुरक्षित अंतर ठेवून सय्यमाने ट्रक चालवत राहिला. रस्ता जरा मोठा झाला
आणि तो माझ्या शेजारून पुढे जाऊ लागला. मी त्याला जमेल तसे अभिवादन केले. आणि काय
आश्चर्य त्याने थोडे पुढे जाऊन गाडी रस्त्याच्या कडेला घेतली आणि मला हात जोडून
नमस्कार केला. अगदी छोटासा प्रसंग पण मनाला भिडला आणि मनातल्या सुखाला देखील.
नारायणगाव चे आगत्य |
असेच थोडे पुढे
जातोय इतक्यात आम्हाला काही सायकल स्वार दिसले. सगळ्यांनी एकाच प्रकारची जर्सी
घातली होती त्यामुळे लांबवरून देखील ते उत्कंठा वाढवत होते. जवळ गेल्यावर समजले की
ते काश्मीर ते कन्याकुमारी अशा प्रवासाचा सराव करत आहेत. दरम्यान हेमंतशी त्यांच्याशी बरेच बोलणे झाले होते. ही मंडळी डिसेंबर
महिन्यात प्रवासाला निघणार होती. त्यांनी दररोज साधारण १४० किलोमीटरचे अंतर
सायकलीवरून कापत साधारण एक महिन्यात हा प्रवास संपवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
सरावासाठी ते शिर्डीला निघाले होते. त्यांच्याशी बोलल्यावर सगळ्यांच्याच अंगात
उत्साहाचे भरते आले आणि आम्ही नारायणगावाच्या जवळ पोचलो देखील. मी आणि अशोक आता
मागे पुढेच होतो. गावातील भर दुपारची रहदारीची वेळ होती. आम्ही दोघे गर्दीतून वाट
काढत बस डेपो पाशी पोचलो. श्रीराज या मसाला दुधाच्या दुकानात पुढे पोचलेले सायकल
स्वार बसलेले दिसले आणि आम्ही आमच्या सायकली तेथे वळवल्या. सगळ्यांची नीर-क्षीर क्षुधाशांती होते न होते तोच, दुकानाचे मालक
सुनीलभाऊ इचके स्वतः आमच्या समोर उभे ठाकले. आमची विचारपूस करून ते म्हणाले की त्यांचा १२५
लोकांचा एक गट आज शिर्डीला सायकलने जाणार आहे. नारायणगाव सारख्या छोट्या गावातून देखील
इतके सायकल प्रवासी निघू शकतात हे कौतुकास्पदच. त्यांच्याशी थोड्या गप्पा झाल्यावर
चांदनने बिल देण्यासाठी खिशात हात घातला परंतु श्रीराजच्या मालकांनी स्पष्ट नकार दिला आणि म्हणाले सायकलीस्टकडून
ते कधीच पैसे घेत नाहीत.
सचिन : विजयी वीर |
चार वाजता परत सायकल
वर स्वार होऊन आम्ही संगमनेर कडे वाटचाल सुरु केली. चढ उतारांचा रस्ता पार करत
चंदनापुरी घाटाच्या मार्गावर कधी पोचलो ते समजलेच नाही. शेखरच्या शाब्दिक कोट्यांना
आता उधाण आलं होतं आमचा हा अनोखा सायकल प्रवास निम्यावर येऊन पोचला होता त्यामुळे सुखाचा
हिंदोळा मनाला झोके देत होता. अशाच प्रसन्न वातावरणात आम्ही संगमनेर पाशी पोचलो
देखील. पंचवटी हॉटेल चा पत्ता शोधून सायंकाळी
७.३० ला आम्ही हॉटेलच्या दारात पोचलो तेव्हा मनात आनंद मावत नव्हता. सारे आपापल्या
खोल्यांमध्ये पांगले. काही मिनिटांमध्ये चंदनला स्वागतकक्षातून फोन आला, तुम्हाला
कोणीतरी भेटायला आले आहे. आम्ही पुणेरी शिष्ट पणाने म्हणालो की आमच्या येथे कोणीही
ओळखीचे नाही त्यामुळे त्यांना विचारा की त्यांना नक्की आम्हाला भेटायचे आहे का? इतके
झाल्यावर आम्हाला राहवेना आणि मग अगदी सेलेब्रिटीच्या ऐटीत आम्ही खाली उतरलो.
स्वप्नील आमची वाटच पहात होते. त्यांच्या बोलण्यातून मग सारा उलगडा
झाला. एका दुचाकीस्वाराने संगमनेर मध्ये शिरता शिरता सचिनची विचारपूस केली होती. हे गृहस्थ म्हणजे डॉ. सोमण. त्यांना आठ जण
पुण्याहून सायकल हाणत आले आहेत याचे कौतुक वाटले आणि त्यामुळे त्यांनी आपल्या
सायकल ग्रुप वर ही माहिती पाठवली आणि आमच्या पाठोपाठ स्वप्नील हॉटेलवर येऊन पोचले. स्वप्नील पुण्याचेच रहिवासी
परंतु दिवाळीसाठी आई वडलांकडे आले होते. ते स्वतः उत्तम सायकलीस्ट असल्यामुळे
अत्यंत आत्मीयतेने त्यांनी आमची चौकशी केली. आणि उद्या सकाळी भेटू असे सांगून आमचा
निरोप घेतला.
आमची टीम निलेश आणि स्वप्नील बरोबर : संगमनेर सोडताना |
दुस-या दिवशी सकाळी
आम्ही तयार होऊन मार्गस्थ होतो न होतो तोच स्वप्नीलने अचानक सायकल वरून आम्हाला गाठले. त्यांच्या
बरोबर त्याचा मित्र निलेश देखील आम्हाला सामोरा आला. आता मात्र आम्हाला खरोखरच
कोणी सेलिब्रिटी असल्यासारखे वाटायला लागले. त्या दोघांनी आम्हाला पुढील रस्ता समजावून
दिला आणि आता फक्त उतारच लागणार अशी हमी दिली. त्यांच्या आश्वासक शब्दांनी आम्हाला
आणखी जोम आला आणि झुंजूमुंजू होता होता आम्ही पुढच्या टप्प्याला पोचलो देखील.
नाशिक मध्ये आगमन |
आता नाशिक अगदी २०
किलोमीटर राहिलं होतं. सगळ्यांचे डोळे मैलाच्या प्रत्येक दगडावर स्थिरावत होते. अखेर
आम्हाला नाशिकमध्ये स्वागत असा फलक दिसला आणि डोळ्याचे पारणे फिटले. आम्ही तपोवनाच्या
रस्त्याला लागलो आणि सचिनचा मित्र जयपाल जमादार आमच्या स्वागताला उभा असलेला
दिसला. त्याच्या पाठोपाठ आम्ही त्याच्या इमारतीत घुसलो. त्याने गुलाबाची फुले देऊन
आमचे स्वागत केले. आमच्या विजयाच्या जयघोषात सारा परिसर दुमदुमला.
दोन दिवसाची, दोन
चाकांवरची दोनशे किलोमीटरची ही आनंद यात्रा आता समारोपाच्या अखेरच्या
टप्प्यावर
आली होती. आमच्या सायकली कृतार्थपणे टेम्पो मध्ये विराजमान झाल्या. आमची मने मात्र
सुखाच्या परमोच्च शिखरावर पोचली होती. आम्ही सायकल प्रवासाचा हा अनवट मार्ग
स्वीकारला आणि या मार्गावर आम्हाला अनेक सुखद अनुभव येत गेले.
डावीकडून : अशोक, शार्दुल, शेखर, चंदन, हेमंत, अश्विनी, द्रुमिल, सचिन आणि जयपाल |
कोणी आम्हाला मसाला
दुध पाजलं तर कोणी जेवल्यावर विश्रातीसाठी जागा दिली. कुणी रस्त्यावर स्वतःचा खोळंबा झाला तरी मोठ्या मनाने आम्हाला पुढे जाऊ दिल तर
कोणी आमची स्वतः येऊन विचारपूस केली. एकंदर काय, सुखाच्या या प्रवासात अनेक जण दोन
पावले चालले आणि आमचा आनंद द्विगुणीत केला. अगदी तुकाराम महाराज त्यांच्या एका
अभंगात म्हणतात ते सार्थ झाल,
सुखाचे व्यवहारी
सुखलाभ झाला आनंद कोंडला मागे पुढे.......