Wednesday 10 October 2018

त्या दोघी


त्या दोघी माझ्या अगदी जवळच्या आणि जिव्हाळ्याच्या. माझ्या दोन आज्या. एक त्या मोठ्याई म्हणजे शांताबाई माधव दांडेकर आणि दुसरी ती मोठ्याई म्हणजे मालती हरी भाटे. दोघीही मोठ्याईच ( खरे तर मोठी आई). पणत्याआणितीच्या संबोधन स्पर्शामुळे काहीश्या वलयांकित वाटणा-या आणि एकमेकींना अगदी समांतर. आम्हा नातवंडांच्या दृष्टीने दोन धृवांवरच्या भिन्न व्यक्ती.

त्या मोठ्याईंचा अर्थातच मान मोठा. वयाने मोठ्या म्हणून आणि अत्यंत विद्वान आणि भारदस्त व्यक्तिमत्व म्हणूनही. आदरयुक्त दुरावाच होता आमच्यात आणि त्यांच्यात. सहवासदेखील फारसा लाभला नाही त्यांच्या बरोबर म्हणूनही असेल कदाचित. त्या होत्याही तशाच अगदी वेगळ्या व्यक्तिमत्वाच्या. त्या मोठ्याई म्हणजे माझ्या वडिलांच्या आई. म्हणजे माझी आजी. तेव्हा प्रतिष्ठित गर्भश्रीमंत कुटुंबांमध्ये आजी असे संबोधता मोठ्याई असे म्हणायची प्रथा होती बहुधा

कै. शांताबाई माधव दांडेकर (आमच्या मोठ्याई)
माझ्या आजवरच्या आयुष्यात मी पाहिलेली ही सर्वात सुंदर स्त्री. संगमरवरी गोरा रंग, निळेशार डोळे, धारदार नाक आणि पातळ गुलाबी ओठ आशी ही लावण्यवती दांडेकरांची गृहलक्ष्मी. आमच्या लहानपणी मोठ्याईंचा सहवास तसा कमीच लाभला. पालघरच्या बंगल्यावर मी त्यांना पत्त्यांचा सिक्वेन्स लावताना पाहिलेय नाही तर हार्मोनियम वर एखादे पद वाजवताना पाहिलंय. माझी मोठी बहिण अनघा. तिने तर त्यांना कॅराम खेळताना आणि प्रतिस्पर्ध्याला लीलया हरवताना पाहिलंय. त्यांच्यावर विधात्याने जशी सौंदर्याची पखरण केली होती तसाच डोक्यावर विद्येचा वरदहस्त देखील ठेवला होता. Beauty with brains म्हणतात ना ते अगदी सार्थ वाटत त्यांच्या बाबतीत. स्वातंत्र्यपूर्व काळात त्या हिंदी कोविद म्हणजे आताच्या एम झाल्या होत्या. हर्मोनियम उत्कृष्ठ वाजवायच्या, शास्त्रीय संगीताची प्रचंड आवड, वाचन अफाट होते तसच अनेक कलांची आवड होती. बाबा आजोबा गेल्यावर त्या पंचवीस एक वर्षे एकाकी होत्या. फिक्या रंगाची नऊवारी साडी, गळ्यात मोत्याची माळ हातात एक एक बांगडी आणि घड्याळ असा साधाच पेहराव असायचा त्यांचा, बाबा आजोबा गेल्यावर. त्यांच्यापाशी क्रोशाने विणलेला एक बटवा असायचा, गोल आकाराचा. तसा बटवा मला वाटत मी परत कधीच कुठे नाही पाहिला.

व्यक्तिमत्व इतक भारदस्त की समोरचा माणूस भारावून गेला नाही तर नवलच. एकदा त्या बेळगावला आमच्याकडे महिनाभरासाठी रहायला येणार  असे कळले. आम्हा मुलांना आई दादांनी बरेच dos and don’ts सांगितले. त्यात आचारटपणा करायचा नाही, त्या तुम्ही असलेल्या खोलीत आल्या तर उठून उभे राहायचे, आमच्याशी बरोबरी करता ते ठीक आहे पण त्यांच्याशी मर्यादेने वागायचे अशा असंख्य सूचना होत्या. आम्ही मुले तर वैतागलोच होतो.
त्या बेळगावला आल्यावर पहिले काही दिवस आम्ही थोडे बुजल्या सारखे वागायचो पण हळूहळू सरावलो त्यांच्या असण्याला. आणि मग थोड अप्रूपही वाटायला लागल त्यांच्या सहवासाच. हार्मोनियम वर फिरणारी त्यांची ती लांबसडक बोटं, गंजिफा सारखा अवघड खेळ लीलया खेळण्याची त्यांची बुद्धिमत्ता, अनेक पुस्तके वाचून त्यावर त्यांनी लिहिलेलं समीक्षण सारच अद्भुत होत आमच्या साठी

आम्हाला पानात वाढलेलं मुकाट्याने खा असे सांगणारी आमची दुर्गामाता ( आई) मोठ्याईंसमोर अदबीने उभी राहून विचारायची आज भाजी कुठली करायची?” तेव्हा आम्हाला आनंदाच्या उकळ्या फुटायच्या. तेव्हा त्या आधाराशिवाय चालू शकायच्या तरीही जरा पायरी आली की मी आणि ताई त्यांचा हात धरण्यासाठी उगाचच चढाओढ करायचो. कारण त्यांचा मऊ मऊ हात हातात घेण्याच अप्रूप वाटायचं. अत्यंत सुस्वरूप, करारी, बुद्धिमान आणि तेजस्वी अस हे व्यक्तिमत्व म्हणजे आमच्या त्या मोठ्याई

याच्या अगदी विरुद्ध अशीती मोठ्याईम्हणजे आईची आई. साधी सुधी गव्हाळ वर्णाची, सात्विक चेह-याची मध्यम उंचीची आणि काटक बांध्याची ही आजी आमच्या बरोबरीची वाटायची. ती अचानक कधीही धुमकेतू सारखी प्रकट व्हायची. तिला पाहिले की आम्ही तिघे प्रचंड खुश व्हायचो. वाडीत असताना तर आम्ही तिघे तिची वाटच पहात असायचो. त्या काळात एकटीने प्रवास करणा-या स्त्रिया तशा विरळाच. त्यामुळे आम्हाला ती झाशीची राणी वगैरे वाटायची. भाऊ आजोबा गेल्यावर ती सदैव पांढरी साडी चोळी नेसायची. आणि वर्षाला फक्त दोनच साड्या घ्यायची. चुकून तिसरी झाली तर कुणा गरजूला दान करून टाकायची.  रामदास स्वामींवर अतीव श्रद्धा असल्यामुळे वर्षातले आठ दहा महिने सज्जनगडावरच वास्तव्य करायची. काही वर्षांनी तिने नर्मदा परिक्रमा केली तीही अनवाणी आणि सदावर्त मागून. अतिशय कष्टप्रद आशी ही परिक्रमा करून आल्यावर तिने तिच्या या अद्भुत प्रवासाची वर्णने वाचायला दिली होती आम्हाला

कै. मालती हरी भाटे (आमची मोठ्याई)
आम्हा नातवंडांशी तिचे विशेष गुळपीठ होतं. केळीच्या बागेत बसून तिच्याकडून ऐकलेल्या विविध देवादिकांच्या गोष्टी, आरत्या आणि श्लोक आजही आठवतात. ती येताना एक झोळीवजा पिशवी घेऊन यायची. या पोतडीतून मग, श्रीखंडाच्या गोळ्या, कुठल्या कुठल्या देवांचे अंगारे, लाडू, शेव गाठी सारखा इतर खाऊ, गंडे अश्या विविध गोष्टी बाहेर पडू लागायच्या.  ती आली की आईला स्वयंपाकघरात मदत करायची, आमच्या डोक्याला तेल मालिश करायची, आम्हाला खाऊ द्यायची, वाडीत आमच्या बरोबर हुंदडायची आणि मुख्य म्हणजे खूप गोष्टी सांगायची. अजित तिचा विशेष लाडका आहे अशी आम्ही दोघींनी तक्रार केली की मग ती आम्हाला दटावायची अगं एकुलता एक नातू आहे तो माझा. अशी ही मोठ्याई स्वातंत्र्यसैनिक होती. गांधीजींच नाव काढाल की भरून यायचं तिला. स्वातंत्र्य संग्रामाच्या वेळी भाऊ आजोबा तुरुंगात असताना तिने घराचा सारा कारभार एकटीने सांभाळला होता. काडी काडी एकत्र करून मोठा डोलारा उभा केला होता तिने. तिची अखंड भ्रमंती सुरु असायची आणि तिथल्या हकीकती आम्हाला समरसून सांगायची

एकदा आम्ही पनवेलला आजोळी गेलो होतो. मोठ्याईच्या मनात आले की अनायसे आपली नातवंडे आलीच आहेत तर त्यांना इतर नातेवाईकांकडे घेऊन जावू. मग काय तिने अचानक आम्हा तिघांची मोट वळली आणि निघाली खालापूरला (पेण-खोपोली रस्त्यावरचे गाव) तेव्हा आतासारख्या वाहतुकीच्या सोई नव्हत्या त्यामुळे मग आम्ही आधी एस. टी. आणि मग चक्क ट्रक ने प्रवास करून खालापूरला पोचलो. काही दिवसातच ही बातमी पालघरला पोचली. मग आईचा अर्थातच मोठ्याईशी वाद. मोठ्याईचे आपले एकच पालुपद. असुदेत तुझी मुले मोठ्या लाडाची पण त्यांना सगळ्याची सवय व्हायला हवी. आईला घराण्याच्या वलयाची भीती असावी पण खरे तर आम्हाला खरच मजा आली होती ट्रक च्या हौद्यातून जायला

मोठ्याई नऊवारी नेसून दोन्हीकडे पाय टाकून माझ्या गाडीवर बसली की माझा उर अभिमानाने भरून यायचा. तिला हिंदी किंवा इंग्रजी का ठो येत नव्हते पण भारत भ्रमण करायची ती. लहर आली म्हणून आणि नर्मदा परिक्रमा केली म्हणून, नर्मदेच्या काठी कर्नाली नावाच्या नितांत सुंदर गावात एकटी जाऊन राहिली होती काही वर्षे.  तिथे देखील स्वताःची ओळख बनवली. प्रचंड समाजकार्य केलं तिने निरपेक्ष वृत्तीने. 

अशी ही मोठ्याई, साधी सोज्वळ, पापभिरू, प्रेमळ आणि कष्टाळू

त्या मोठ्याई आणि ती मोठ्याई या खरेम्हणजे एका पिढीचा परिघच. या दोघी म्हणजे त्याच्या वेळच्या  सा-या स्त्रीवर्गाचा  आलेख. अगदी सर्वसमावेशक आलेख. एक राजवैभव उपभोगलेल्या, गर्भश्रीमंत, उच्चविद्याविभूषित, कर्तव्यतत्पर, अभिरुची संपन्न आणि करारी.  तर दुसरी काहीशी कर्मठ, देवभोळी, प्रेमळ, कष्टाळू, सहनशील आणि सर्वसमावेशक.  दोघीही आपापल्या जागी श्रेष्ठच. अगदी एकमेकींच्या विरुद्ध. कधीही एकत्र येऊ  शकणा-या दोन समांतर रेघा. पण त्या दोघींच्या नकळत त्यांनी घडवलेली आम्ही त्यांची तीन नातवंडे. दोघींमधले  काही ना काही तरी कणभर का होईना आमच्यात नक्कीच सामावले असणार आणि नकळत आम्ही त्याना आमच्यात एकत्र आणले असणारच की. त्या असतील जगल्या अगदी समांतर आयुष्ये पण शेवटी त्यांच्या नकळत त्यांच्या तिस-या पिढीने आपल्या मनात त्यांची एकत्र प्रतिमा साठवली त्या आणि ती गाळून क्त मोठ्याईची. समांतर व्यक्तीमत्वांची एकरूप प्रतिमा. ‘मोठ्याई’.

सुधारस

सौ. सुधा गणेश सोवनी  त्यांना मी जेव्हा प्रथम भेटले तेव्हाच त्यांचा प्रेमात पडले.  आणि आमचे हे प्रेमाचे सुंदर नाते बघता बघता सव्वीस वर्षांचे...