सौ. सुधा गणेश सोवनी |
अत्यंत
सालस, भोळ्या पण प्रसंगी ठाम निर्णय घेणाऱ्या, दूरदर्शी, कोणत्याही प्रसंगात न
डगमगणा-या, अत्यंत बुद्धिमान, आधुनिक विचारांच्या आणि निर्मळ मनाच्या आशा माझ्या मावशी
हे एक अत्यंत दुर्मिळ व्यक्तिमत्व. पटकन साऱ्यांना आपलेसे करणाऱ्या,
निर्मळ स्वभावाच्या, अचूक निर्णय घेणाऱ्या कधीच कोणाला न दुखावणाऱ्या, आयुष्यात कधीच
वावगा, शब्द न काढणाऱ्या, संसारात राहूनही ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो
द्यावे समाधान हा अभंग शब्दश: जगू शकलेल्या आशा होत्या माझ्या सासूबाई.
तेव्हा
मी आणि चंदन एकाच कंपनीत काम करायचो. मी हॉस्टेल वर राहायचे आणि चंदन पक्का
पुणेकर. त्यामुळे साहजीकच त्यांच्या घरी येणे जाणे सुरू झाले. आणि मग माझी मावशींबरोबर बघता बघता गट्टी जमली. त्या आणि माझे दादा (वडील) यांच्या मुळेच मग माझी आणि
चंदनची कभी हा कभी ना वाली मैत्री विवाहात
परावर्तीत झाली. आणि मग माझा सुरू झाला मावशीमय होण्याचा प्रवास.
त्यांच्या कडे एक अत्यंत सकारात्मक ऊर्जा होती त्यामुळे मग कितीही नाठाळ मनुष्य त्यांच्या
प्रवास जीव की प्राण |
सहवासात येऊन काही वेळ का होईना सात्विक व्हायचा. मी तर काय त्यांच्या अखंड सहवासात होते. त्यामुळे मग आई दादांनी हात टेकलेली ही दांडेकरांची अवखळ कन्या 😛सोवनींची सून झाल्यावर सुतासारखी सरळ झाली.
सकाळचा चहा सोबत घेतल्या शिवाय आमचा दिवस कधीच सुरू झाला नाही आणि ऑफिस
मधून आल्यावर त्यांना दिवसभरातील घडामोडी सांगितल्याशिवाय एक दिवसही सरला नाही.
तेव्हा
आम्ही मॉडेल कॉलनीत राहायचो. थोड्याच काळात त्यांच्या ध्यानात आले की ही मुलगी आता
आयुष्य भर काही आपला पदर सोडत नाही. मग आम्ही लॉ कॉलेज रोड च्या प्रशस्त सदनिकेत राहायला आलो आणि तिथेच तब्बल 26 वर्षे राहिलो. या
काळात अनेक स्थित्यंतरे आली आमच्या आयुष्यात पण त्यांनी आमच्यावर धरलेले मायेचे छत्र
कधीच ढळू दिले नाही.
आमच्या
लग्नाआधीच त्या ट्रेझरी ऑफिसर म्हणून निवृत्त झाल्या होत्या. त्यांच्या काळात
जेव्हा स्त्री चूल आणि मूल या पलीकडे विचार करू शकत नव्हती तेव्हा त्या एक अत्यंत यशस्वी शासकीय अधिकारी होत्या आणि तितक्याच सफल गृहिणी, माता आणि पत्नी आणि नंतर सासूबाई
देखील.
निवृत्ती
नंतर, प्रवास केला, आध्यात्मिक वाचन मनन केले, ज्योतिष शिकल्या आणि सर्वात
महत्वाचे म्हणजे सुनेला वळण लावले आणि नातवंडांना सुजाण नागरिक बनवले. जे जे त्यांच्या आयुष्यात
आले त्यांना आपल्या व्यक्तिमत्वाच्या प्रभावाने मंत्रमुग्ध केले.
माझ्या
साठी तर त्या friend-philosopher-guide होत्या. मी आपली त्यांच्या
कडे, मुले अभ्यास करत नाहीत इथपासून ते माझ्या क्लाएन्टने माझे कसे पैसे बुडवले
इथपर्यन्त वाटेल त्या समस्या घेऊन जायचे. आणि त्या अगदी शांत पणे, अग करेल तो
अभ्यास, काळजी करू नको, असे समजावण्या पासून ते उद्या मी येते तुझ्या बरोबर कसे मिळत नाहीत पैसे
तुझ्या क्लाएन्ट कडून ते बघू आपण असे
सांगून धीर देण्यापर्यंत सगळे तोडगे अगदी सहज सांगायच्या.
दुपारी
हमखास फोन करून उगाचच विचारायच्या, अग रात्रीला काय स्वयंपाक करूया? आणि मग मी
मीटिंग मध्ये असल्याचे सांगितल्यावर बर मी बघते म्हणायच्या. गेले नऊ महीने रोज मी
या एका फोन ची वाट बघतेय माहीत असून देखील की आता असा फोन कधीच येणार नाहीये.
चंदन
त्यांचे शेंडेफळ. अत्यंत लाडका. आमच्या
लग्नानंतर अगदी नकळत त्यांनी स्वतःला अलिप्त करत आमच्या सांसाराला खत पाणी घातले
आणि आमच्या मागे खंबीर पणे उभ्या राहिल्या. पण त्यांनी आमच्यावर फक्त ऊन्हाचे चटके
बसणार नाहीत एव्हढीच सावली धरली. नाजुक रोपट्याचे वृक्षात रूपांतर होईल याची काळजी
घेतली, आमच्या नकळत.
आमची
सासू सुनेची जोडीच आगळी वेगळी. खरेदी साडीची असो नाहीतर गाडीची, आम्ही तितक्याच
उत्साहाने करायचो. दहा दहा हजारांची पुस्तके आणून येईल जाईल त्याला वाटत बसायचो,
मार्केट यार्डात जाऊन किलो वारी फुले आणि भाजी आणायचो. आणि एकदा हा हावरटपणा करून झाला
की नामा निराळ्या झालेल्या सुनेकडे कानाडोळा करून त्या भाज्या फळांची उस्तवार करत बसायच्या.
सारे काही बिनबोभाट.
त्यांचे
धार्मिक आचार देखील खूप अनवट. दरवर्षी पितृ पक्षात साधारण 40 नैवेद्य केले जायचे.
हे नैवेद्य नातेवाईक, मित्र मंडळी, सगे सोयरे यांच्या बरोबरच अनेक स्वातंत्र्य
सैनिकांच्या नावाने वाढले जायचे अत्यंत भावुक पणे. इतके सारे त्या करायच्या पण एका
शब्दाने देखील त्या कधी म्हणाल्या नाहीत की हे सारे तूला पुढे करायचे आहे म्हणून.
आमचे कुटुंब |
त्यांचे व्यक्तिमत्व हा एक सुरेख विरोधाभास होता. हळव्या आणि धैर्यशील, कलासक्त आणि विज्ञाननिष्ठ, प्रवास आणि आवासावर समरसून प्रेम करणाऱ्या, उत्तम अधिकारी आणि उत्तम गृहिणी. उत्तम आई आणि आदर्श सासूबाई. पण सर्वात महत्वाचे म्हणजे एक अत्यंत समृद्ध आणि निर्मळ व्यक्ती.
ऑक्टोबर
2022 ला त्यांना कर्क रोगाने ग्रासले. पण कोणताही त्रागा न करता त्या आजाराला
सामोऱ्या गेल्या. शेवट पर्यन्त स्वावलंबी होत्या. शेवटच्या आठवड्यापर्यन्त संध्याकाळी
घरी आल्यावर कशा आहात असे विचारले की “उत्तम” म्हणायच्या. आणि सकाळी साडी नेसून कामावर
निघाले की प्रसन्न हसून छान दिसतेस म्हणायच्या. अत्यंत स्थितप्रज्ञपणे सर्व
वेदनांना हसत मुखाने कवेत घेऊन शांतपणे त्यांनी आपली जीवन यात्रा संपवली.
सुमधुर
वाणीचा, सात्विक व्यक्तिमत्वाचा, प्रसन्न हास्याचा, प्रगल्भ विचारांचा हा अलौकिक सुधारस
मात्र आम्हा सर्वांसाठी त्या सोडून गेल्या. हा अक्षय सुधारस त्यांच्या संपर्कात
आलेल्या प्रत्येक व्यक्तीला मिळालाय. न मागता सवरता.
खूप सुंदर शब्दांकन !
ReplyDeleteविषय आणि आशय मनापर्यंत पोहोचला. अशी सासू मिळणे आणि सासूला अशी सून मिळणे दोन्हीही पूर्व-पुण्याच्याच गोष्टी !
धन्यवाद संजयजी. हे पूर्व संचितच
Deleteसुधारस नावाप्रमाणे खूप सुंदर जमून आलाय आजकाल केवळ नावाला सासू ला आई म्हणतात पण तुमचे सासूसून संबंध खरेच सुधारस प्रमाणे गोड होते खूप छान लेख
ReplyDeleteत्यांच्या स्म्रूति ला अभिवादन
सुधीरजी धन्यवाद. आपण नेहमी प्रतिक्रिया नोंदवता त्या बद्दल मी आपली ऋणी आहे.
Deleteवाह अप्रतीम.. मावशींचा चेहेरा लगेच समोर आला.. अतिशय शांत संयमी आणि कणखर व्यक्तिमत्व
ReplyDelete. त्यांचा सर्वाधिक सहवास तुला लाभला हे भाग्यच.. तुझे प्रवाही लिखाण खूप कौतुकास्पद आहे.. 👍
धन्यवाद अजित. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभावच इतका जबरदस्त आहे.
DeleteWell written blog of beautiful pious relation of dear mother and daughter in law which is rarely witnessed now a days. Beautifully and lively penned,as always .
ReplyDeletethanks a lot milind. Yes we had a rare relationship.
Deleteअप्रतिम..चटकन मावशींचा सोज्वळ चेहरा डोळ्यासमोर उभा राहिला. एक मनमिळाऊ, सालस व्यक्तिमत्त्व पहिल्या भेटीतच आपलस करून कायम मनात राहणार्या. अश्या ह्या व्यक्तिमत्त्वाचा सहवास तुला सासू म्हणुन लाभला अर्थात (एक मनमिळाऊ मैत्रीणच) तुझे भाग्यच म्हटले पाहिजे..
ReplyDeleteखूप खूप आभार विद्या. त्यांचा सहवास ही खरंच ईश्वर कृपा.
Deleteअतिशय सुंदर... मावशींच व्यक्तीमत्व आणि तुमच्या दोघींचे संबंध उत्कृष्ट पणे उलगडून दाखवलेस...माझं चुकत नसेल तर त्यांनी नर्मदा परिक्रमा केली होती ना?
ReplyDeleteधन्यवाद राजीव. माझ्या आजीने (आईची आई) नर्मदा परिक्रमा केली होती.
DeleteSo beautifully penned. I could actually visualise Kaku. Her words "Uttam" "Chan diste" "Bara"... still ring in my ears.
ReplyDeleteGod bless her wherever she is...
Yes kaushal. We are so fortunate indeed.
Deleteखूप सूंदर लिखाण, आणि अश्या व्यक्तिमत्वाचा सहवास लाभण म्हणजे खरंच नशीबच
ReplyDeleteधन्यवाद. खरेच अशी सोन्यासारखी माणसे मिळायला भाग्य लागते.
DeleteYou and your mavshi were so close, you both supported each other, two very able , affectionate and strong women.
ReplyDeleteThank you Reshma. Yes I was fortunate to spend long time with her. We had an amazing time indeed.
DeleteAshvini madam, what you have expressed in your write up is in toto applicable to Sudha Sovani, we were colleagues from 1969,we had very good family relationship, she was good natured person, In the event of my younger sons illness she gave us courage, She was very good planner, we have almost covered all states tours which are most memorable, but due to lack of communications we could not meet her during her illness, we knew message of her demise from treasury person I could take last Darshan at Kailash Dahini, we, our family miss her for ever, I pray God to rest her soul in pease Om shanti, unforgettable personality
ReplyDeleteyes kaka. I know how you feel. Our families are very close. And all of us miss her a lot.
Delete