अगदी लहान असताना जर काही चुकले ( म्हणजे तसे आईला वाटायचे मला माझे कधी काही चुकते असे वाटत नसे) की ती देवघरात नेऊन म्हणायची की म्हण “देवा माझं चुकलं”. हीच माझी ईश्वराची पहिली ओळख. तेव्हा हे सारे देव म्हणजे ईश्वर आई पेक्षा कोणी तरी मोठे आहेत असेच वाटायचे. त्या पलीकडे जाऊन ईश्वराचा विचार करावासा वाटलाच नाही.
आमच्या वाडीतल्या घरी अनेक प्रकारचे पाहुणे यायचे. एकदा एक
गौर नावाचे कोणीतरी आमच्या कडे आले होते. त्यांची साधारण ७-८ वर्षांची मुलगी
माझ्याच वयाची असल्याने दिवसभर माझ्याशी खेळण्यात रंगून गेली होती. आम्ही मागच्या
अंगणात तुळशीवृंदावनापाशी काही तरी खेळत होतो. माझे मोडकेतोडके हिंदी ती कसे बसे
समजून घेत होती. ती मला म्हणाली की आपण आता मंदीर मंदिर खेळू. मला घर घर, डॉक्टर
डॉक्टर एव्हढे माहित होते पण हे काय नवीन प्रकरण आहे असे म्हणून मी तिला म्हटले
चालेल पण कसे खेळायचे? ती म्हणाली की हे तुळशी वृंदावन म्हणजे आपले मंदिर. या मंदिरात
जाऊन आपण नमस्कार करायचा. मी म्हटले इतकेच ना? चल तर मग. आम्ही दोघी देवळात उभे
राहावे तशा हात जोडून उभ्या राहिलो. आणि तिचे लुटू पुटू ची पुजेची थाळी वगैरे सर्व
काही सोपस्कार करून झाले. आणि मग खोटा खोटा प्रसाद खाऊन झाल्यावर तिने मला विचारले
की तू देवा कडे काय मागितलेस? मी म्हटले, “तेच
नेहमीचे, देवा मला चांगली बुद्धी दे”. मी तिला म्हटले तू काय मागितलेस? ती शांतपणे
अगदी आज्जी च्या अविर्भावात म्हणाली, अग माझी आजी म्हणते, ईश्वराकडे काही मागायचे
नसते. तो देतो आपल्याला हवे ते. त्या क्षणी मला अगदी ब्रम्हज्ञान झाले असे वाटले.
आणि तेव्हा पासून मी कधीही ईश्वरासमोर हात जोडून उभी राहिले तरी मला त्या मुलीची
आठवण येते. ही मला परत कधीही न भेटलेली ईश्वराच्या शोधाच्या वाटेवर भेटलेली एक दिवली.
जरा मोठे झाल्यावर आपण अभ्यास केला असेल तेव्हढेच मार्क
परीक्षेत मिळतात निकालाच्या आदल्या दिवशी “देवा
मला पास कर” असे म्हणून काहीही होत नाही इतपतच अक्कल आली. परंतु खरी संकल्पना दृढ
झाली ती पंख फुटून मोकळ्या आकाशात झेप घेतली तेव्हा.
एम. बी. ए. झाल्यावर मोठ्या उत्साहाने मी मुंबई मध्ये नोकरी निमित्त एकटी राहू लागले. संध्याकाळी आठ च्या सुमारास गोरेगाव स्थानकावर मी रिक्षा केली इतक्यात एक मनुष्य पटकन रिक्षात चढला आणि शेजारी बसून माझ्याशी लगट करू लागला. रिक्षा चालकाला वाटले की तो मनुष्य माझ्या बरोबर आहे आणि त्याने रिक्षा चालू करून मला विचारले की कुठे जायचे आहे. मला एकंदर प्रसंगाची कल्पना आली होती. मुंबईत नवीन असल्यामुळे आणि अतिशय संरक्षित वातावरणात वाढलेली असल्यामुळे खरतर बावळटच होते मी. पण कसे कोण जाणे माझ्या तोंडातून शब्द बाहेर पडले, गोरेगाव पोलीस स्टेशन मध्ये घ्या. हे ऐकता क्षणीच माझ्या शेजारी बसलेला तो गुंड चालत्या रिक्षातून उडी टाकून पसार झाला. आणि मला ईश्वराची पहिली प्रचीती आली.
या नंतर हा ईश्वर मला परत परत भेटत राहिला. अनेक रुपात अनेक प्रसंगात अनेक सुख
दुखाच्या क्षणी. अनेक ठिकाणी आणि विविध वेळी त्याचे अस्तित्व जाणवत राहिले.
पूर्वी माझे वडील एक वाक्य अनेकदा म्हणायचे, “मृत्यू देतो तो ईश्वर”. हे अगदी
शब्द शहा खर असलं तरी मी पुढे जाऊन म्हणेन “मृत्युलोकात जगायला शिकवतो तो ईश्वर”. कधी माता पित्यांच्या रूपाने, कधी
शिक्षकाच्या, कधी मित्रांच्या, कधी नातेवाईक तर कधी सहकाऱ्यांच्या. त्याचा परीस
स्पर्श आपल्या सगळ्यांनाच होतो. फक्त गरज असते त्या स्पर्शाची जाणीव होण्याची.
आपल्या जाणीवा जश्या जास्त जास्त परिपक्व होतात तसतसं त्याच अस्तित्व स्पष्ट होत
जातं. इतकंच.