Search This Blog

Tuesday, 3 December 2024

अतरंगी प्रवासातील बहुरंगी माणसे


हीच खरी आतरंगी माणसे 😀

जवळजवळ एक तप  लोटले मला सायकल परत चालवायला लागून. महाविद्यालयात असे पर्यंत अगदी नियमितपणे सायकल चालवत असूनही पुढे नोकरी व्यवसायाच्या मागे धावताना सायकलीची संगत कधी सुटली ते कळलेच नाही. पण मग कशाने कोण जाणे पण ही सायकल सखी परत गवसली आणि मग आमची स्वारी या सखी बरोबर आकाशाला गवसणी घालायला निघाली. 

सायकलिंगची माझी मजल आता पुण्या बाहेर जाऊन १०० ते १५० किलोमीटर करण्यापर्यंत पोचली होती. इतक्यात काही मित्र मैत्रिणींकडून युरोप सायकलिंग बद्दल समजले आणि मग मी आणि चंदनने परदेशी सायकल प्रवास करायचे ठरवले. आणि मग आम्ही अशा प्रवासाच्या प्रेमातच पडलो. मग २०१५  आणि २०१८ ही दोन वर्षे जर्मनी, ऑस्ट्रिया, स्लोवाकिया आणि हंगेरी अशा देशांमध्ये सायकल सफारी केल्या. 

साठे काकूंचे विश्रांती गृह 
युरोप म्हणजे सायकलिंग साठी स्वर्गच. नदीच्या किनार्‍यावरून जाणारे अत्यंत सुंदर सायकल रस्ते, टुमदार गावे, निर्मळ  आणि नयनरम्य नदीचे पात्र, कधी जंगलातून जाणारा रस्ता तर कधी गवताळ प्रदेशातून. ना कुठे कचरा, ना दुषित हवा, ना गाड्यांचे आवाज. सारं कस नीटनेटक आणि स्वप्नवत. 

अशा  या प्रवासात देशो देशीची बहुरंगी माणसे आणखी रंगत आणत गेली आणि आमचे अनुभव समृद्ध बनवू लागली. 

युरोपातला सायकल प्रवास म्हणजे रोज सकाळी पोटभर न्याहारी करून सायकल वर टांग टाकायची आणि मग

युरोपांतील सासू सुनेची अजोड जोडी आणि आम्ही सारे  

दिवस भर सायकल चालवून पुढील गावाला पोचायचे. असा हा आमचा कार्यक्रम अगदी आठवडाभर चालायचा. अशा या अतरंगी प्रवासाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी आम्हाला मग भेटायची बहुरंगी माणसे. 

ऑस्ट्रियाच्या सायकल प्रवासात आम्हाला भेटलेल्या स्टोकल या हॉटेलच्या मालकीण बाई जगात भारी. हे एक छोटेखानी कुटुंबवत्सल हॉटेल. आम्ही आमच्या सायकली लावून हॉटेल मध्ये गेलो तर एका तरुणीने आमचे स्वागत केले आणि म्हणाली जरा थांबा माझ्या सासूबाई तुमच्याशी बोलतील. इतक्यात साधारण साठी पार केलेल्या काकू आमच्या पुढ्यात उभ्या ठाकल्या आणि काम चलाऊ  इंग्रजीत बोलू लागल्या. त्यांनी आम्हाला खोल्या दाखवल्या आणि बाकी माहिती दिली. मग आम्हाला कळल की त्यांना प्रवासाची आवड आहे आणि त्या अनेक देशात प्रवास करून आल्या आहेत. भारतात यायचे राहून गेले म्हाणाल्या. थोडी दोस्ती झाल्यावर आम्ही त्याचं नामकरण  साठे काकू   असे करून टाकले. अत्यंत चटपटीत, मार्दव पूर्ण बोलणे पण जिथे आवश्यक तिथे स्पष्टवक्त्या अशा या साठे काकुंशी ब-यापैकी ओळख झाल्यावर दुस-या दिवशी मी त्यांना विचारले की आमच्या काही लोकांना आम्लेट खायाचेय तर त्यात तुम्ही मिरची चिरून घालाल का? इतका वेळ अत्यंत नम्रपणे बोलणारी ही ललना एकदम बिथरली आणि  म्हणाली नाही नाही मी मिरच्या अजिबात घालणार नाही (जसे काही मी त्यांना विष घालाल का असे विचारात होते जणू) तुम्ही तुमच्या हाताने हवे तेव्हढे तिखट वरून घालून घ्या. (आणि बहुतेक मनात म्हणाल्या असणार मरा). मी डोक्याला हात लावून निमूटपणे बाहेर आले दुसरे काय?  दुसरे काय? या काकूंची सून त्यांची मदतनीस बारे का. अगदी भारतीय सुने सारखीच. अगदी निघताना आम्ही या सूनबाईंना म्हणालो की, आम्हाला तुझ्या  बरोबर फोटो काढायचाय. तर म्हणते कशी, थांबा आलेच सासुबाईंची परवानगी घेऊन. मी गेले की हो कोमात. इतकी आज्ञाधारक सून आणि कह्यात ठेवणारी सासू आणि तीही युरोपात म्हणजे नवलच की हो. 

 मरियन आणि राल्फ

असेच एक जर्मन जोडपे आम्हाला स्लोव्हाकिया मध्ये भेटले. मरियन आणि राल्फ हे जर्मन जोडपे साधारण साठी पार केलेले. मरियन शिक्षिका आणि राल्फ बेकर. हे दोघे दर वर्षी मोठ्या सायकल प्रवासाला जातात. ते आपल्या सायकली घेऊन आले होते. राल्फ ने जर्मनीचा झेंडा सायकल ला लावला होता. त्याने मला सांगितले की पुढील वर्षी आपण परत युरोप मध्ये सायकलिंग ला भेटू आणि तेव्हा तू भारताचा झेंडा नक्की आण. किती साधी गोष्ट पण त्याने इतक्या आत्मीयतेने सांगितले की ते माझ्या डोक्यात  अगदी पक्के बसले. आता कुठे ही गेले तरी आपला तिरंगा घेऊन जायचा हे नक्की. 

असेच हंगेरीला आम्ही थोड्या अंतरावर बस ने चाललो होतो. मी थंडी असल्याने डोक्यावर बफ (एक प्रकारचा  कान टोपी सारखा रुमाल)  घातला होता. तर माझ्या समोर बसलेल्या एका बाईने चक्क माझ्या कडून तो बफ जवळ जवळ हिसकावून घेतला आणि म्हणाली राहू दे मला. कसा बसा परत मिळवला मी तो. पण अगदी चकितच केले तिने. तोपर्यंत माझा समज होता की भारतातच फक्त ठग असतात. अगदीच भ्रमनिरास केला की हो त्या हंगेरियन ललनेने. 

अवघे पाऊणशे वयोमान 
आमच्या याच प्रवासात आम्हाला अगदी शेवटच्या दिवशी इंग्लंडहून आलेले काका भेटले. फक्त पाउणशे वयोमान
बर का. आणि साधारण पाचशे किलोमीटर सायकलिंग करून आले होते आणि अजून २०० -३०० करीन म्हणतो असे म्हणाले. अत्यंत काटक आणि बिनधास्त. 

तर अश्या अतरंगी प्रवासात भेटलेल्या बहुरंगी व्यक्ती. प्रवास अतरंगी असल्याने भेटणारे बहुरंगी असणारच नाही का. या व्यक्ती वाचण्याच कसब मात्र आत्मसात करायला हवे.  प्रवास असतोच मुळी त्या साठी. व्यक्ती तितक्या प्रकृती. तुमची मात्र प्रकृती सकारात्मक हवी या व्यक्तीची प्रकृती कशीही असली तरी सामावून घेण्याची. 


अतरंगी प्रवासातील बहुरंगी माणसे

अतरंगी प्रवासातील बहुरंगी माणसे

हीच खरी आतरंगी माणसे 😀 जवळजवळ एक तप  लोटले मला सायकल परत चालवायला लागून. महाविद्यालयात असे पर्यंत अगदी नियमितपणे सायकल चालवत असूनही पुढे नो...