Search This Blog

Tuesday, 2 December 2025

लक्ष्मीचे पैंजण


या वर्षीची दिवाळी खरंच खूप वेगळी आणि विशेष. सगळ्यात महत्वाचे म्हणजे, ही आमची नूतनीकरण झालेल्या वस्तूतील पहिली दिवाळी. आणि चंदन इटली येथे गेला असल्याने त्याच्या शिवाय अशी देखील पहिलीच दिवाळी.

दिवाळीची तयारी तशी घाईतच संपली. माझ्या पाक कौशल्यावर माफक विश्वास असूनही चंदनने मला घाईत चकल्या व लाडू करायला लावले तेव्हा मला अगदी मास्टर शेफ जिंकल्यासारखे वाटले. त्याची परदेशी पाठवणी केल्यावर अगदी मन आवरून कोणतेही नवीन पुस्तक वाचायला न काढता मी घर आवरले.

आणि मग तो लक्ष्मीपूजनाचा सुदिन उगवला. उगाचच मुलांमागे लकडा लावून, फुले आण माफक रोषणाई करण्यात दिवस सरला देखील.

पंचांगात बघून ( तसे व्हाट्स अप वर सर्व आवश्यक माहिती अनेक वेळा वाचली होती बरे का) पूजेचा मुहूर्त पाहिला आणि मग तनया द्रुमिल च्या मागे लागून पूजेची साग्रसंगीत तयारी केली.

अनेक वर्षे मावशींच्या (सासूबाईंच्या) हाताखाली फक्त सांगकामेपणा नामक उनाडपणा केला होता. तरीही बऱ्यापैकी सामान जमवून तयारी झकास झाली आहे असे  मीच जाहीर करून टाकले. आता पूजा सांगण्याची हीच ती वेळ हे ध्यानात आल्यावर मग पुस्तकांची आठवण झाली. आणि काय आश्चर्य लक्ष्मी पूजनाचे मीच पूर्वी कधी तरी ठेवलेले एक पुस्तक देवघराच्या कप्प्यातून अचानक प्रकट झाले. मी अगदी  हरखूनच गेले की हो. 

या पुस्तकातील पूजा एकदम सुसंगत आणि सोपी वाटली. पूजा सांगितली आणि तशी दोन्ही मुलांनी भक्तिभावाने केली देखील. पूजा संपता संपता मला अचानक पैंजणांचा आवाज येऊ लागला. अगदी नाजूक आणि मंद. एखादी घरंदाज स्त्री नाजूक पावलांनी गृह प्रवेश करते तसाच होता तो पदरव. पूजेच्या खोलीतून बाहेर डोकावून पाहिले परंतु दिसले मात्र कोणी नाही.

पूजा अगदी मनासारखी झाली आणि आरती  देखील साग्रसंगीत  झाली. फराळाचा नैवेद्य दाखवून झाला. तरी तो नाजूक पैंजण परिधान केलेल्या पावलांचा आवाज अधूनमधून येतच होता. लक्ष्मी जणू भरल्या पावलांनी घर भर फिरत असावी तसा आवाज.

माझ्याच मनाचे खेळ असावेत असे वाटे पर्यन्त तनया देखील म्हणू लागली बघ आई हा आवाज येतोय कुठून तरी.

मन अगदी प्रफुल्लित झाले आणि हात जोडून डोळे मिटून मनोमन म्हणाले देखील, माते लक्ष्मी अशीच कृपा असुदे बर का या घरावर. आणि मग डोळे उघडते तर काय एक हिरवा गार नाकतोड्या भिंतीवर विराजमान झालेला दिसला आणि तो मधूनच हालचाल करायचा तेव्हा अगदी पैंजणांचा आवाज करायचा.

आम्ही दोघी आश्चर्य चकित झालो अगदी. पण काही का असेना, मी म्हटले तनयाला. बघ आज या नाकतोड्याचे भाऊ बंद अनेक घरात असेच मजा करत फिरत असतील. पण आपण दोघींनी या एकट्यालाच देवत्व बहाल केले की नाही. जाऊन सांगेल तो आता त्याच्या भाऊबंदांना.  बेटयांनो देव असतोच चराचरात पण  देवत्व देतो तो मानव! आणि भेटल्या बर आज मला दोन मानवी माझ्यात देवत्व पाहणाऱ्या.

हसलो आम्ही तिघेही खूप आणि भरला आनंद घराच्या काना कोपऱ्यात. तर बर का मंडळी. अशी लक्ष्मीची पाऊले येऊ देत तुमच्याही घरात. बिन पैशाचा आनंद घेऊन येऊदे एखादा नाकतोड्या. विसावूदे त्याला तुमच्या भिंतीवर.  आणि मग येईल तुमच्या घरी देखील सुखं समाधानाची लक्ष्मी नाजुक पावलांनी वावरायला कायमची.

19 comments:

  1. खूप छान लेख आहे देव कोणाच्यातरी रुपात येतो सूचकपणे काही खुणा दाखवतो आपल्याला त्या समजल्या पाहिजेत तुझ्या घरी नक्की लक्ष्मी आली माझा विश्वास आहे

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद सुधीर काका. खूप छान प्रतिक्रिया.

      Delete
  2. वाह खूपच सुंदर वर्णन. तुमच्या घरात देवी लक्ष्मी नक्कीच वास करीत आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद मकरंद दादा

      Delete
  3. किती छान! खूप सुंदर विचार आणि भावना....खरोखरीच जशी दृष्टी तशी सृष्टी

    ReplyDelete
  4. धन्यवाद मकरंद दादा

    ReplyDelete
  5. सुंदर लिखाण....

    ReplyDelete
  6. खूप छान लिहिले आहे. देव कुहल्याही वेळी आणि रूपात भेटी शकतो. फक्त आपण स्वागताला तयार असायला हवं.

    ReplyDelete
  7. So Beautifully Expressed...

    बिन पैशाचा आनंद वाक्य भावले. घरच्या सर्व सदस्यांनी आपुलकीने, प्रेमाने व एकत्र हसत_खेळत वेळ मोकळेपणाने घालवणे...

    और जीने को क्या चाहिए !!

    ReplyDelete
  8. खरोखरच खूप छान लिहिले आहे! सामान्य आयुष्यातील हे छोटे प्रसंग आणि त्यावरचे तुझे भाष्य खिळवून ठेवते."
    वाचताना असे वाटले की आम्ही तुमच्या समोर बसून तो प्रसंग अनुभवत आहोत. 'नाकतोड्याचे भाऊबंद' ही कल्पना खूपच गमतीशीर आहे."

    ReplyDelete
  9. नागतोडया लक्ष्मीचे रुपात आला व लक्ष्मी पूजन सार्थकी लागले.

    ReplyDelete
  10. चंदन नी तर हजेरी लावली नाही ना !!!

    ReplyDelete

अतरंगी प्रवासातील बहुरंगी माणसे

लक्ष्मीचे पैंजण

या वर्षीची दिवाळी खरंच खूप वेगळी आणि विशेष. सगळ्यात महत्वाचे म्हणजे, ही आमची नूतनीकरण झालेल्या वस्तूतील पहिली दिवाळी. आणि चंदन इटली येथे गेल...