Search This Blog

Monday, 31 August 2020

वेड्या रविवारची कहाणी

 

मै और मेरी तनहाई 

लॉक डाऊन ची मरगळ जरा कमी होतेय. आम्हाला  रिकामपणचे उद्योग सुरु करण्याचे वेध लागतायत. एकदा तो करोना हद्द पार झाला की कुठे कुठे ट्रेकिंग ला जायचं या बद्दल गप्पा झडतायत. आणि माझी मात्र सायकलिंगची ओढ अनावर होतेय. मी सगळ्यांना सारखी समजावते की सद्य परिस्थितीत सायकल प्रवास हाच सर्वोत्तम पर्याय आहे.

आमच्या सायकल वाऱ्या सुरु झाल्या देखील. मग दर शनिवारी पुण्याच्या सर्व दिशा धुंडाळून होतात. मागचा रविवार मात्र थोडा वेगळा.

अनिरुद्ध आणि हेमंत बरोबर ठरलेले सर्व बेत ऐनवेळी रद्द होतात पण माझे हट्टी मन अजिबात माघार घेऊ इच्छित नाही.  मी उद्या एकटीच सायकलिंगला जाणार असल्याची घोषणा करते. इतक्या वर्षाच्या अनुभवाने चंदनने माझ्या नादी लागणे सोडून दिलेय त्यामुळे तो मूक पाठींबा दर्शवतो.

२०१४ साल पर्यंत केलेल्या सोलो सायकलिंग चा अनुभव गाठीशी असतोच.  रविवारी सकाळी ५.३० वाजता मी सायकल वर saddle bag लावते आणि मार्गस्थ होते. निर्मनुष्य रस्त्यावरून दोन चाके संथ गतीने धावू लागतात आणि माझे मन मात्र वायू वेगाने पुढे धावू लागते. 

वाघोलीचा वाघेश्वर

    आता माझा माझ्याशी संवाद सुरु होतो. सोलो सायकलिंगचा हा     पहिला एक तास मला खूप आवडतो. या तासात आधी मन        संभ्रमित असतं. थोडी हुरहूर असते. त्या एकटेपणाची अजून        सवय होत असते. थोडी मजा वाटते आणि ग्रुप सायकलिंगची        धमाल आठवून जरा कससही वाटते.  यातच कुठे तरी आपला        आपल्याशी संवाद सुरु होतो. विचारांचा गुंता सुटायला लागतो        आणि आपल्या विचारांना आपल्या मनात शिरायला जरा वाव        मिळू लागतो.

“अरेच्चा इतके काही वाईट नाही आपले मन. बरे आहे की. जमतंय की आपल्याला थोडा अंतरंगाशी संवाद साधायला.” असे म्हणे म्हणे पर्यंत वाघोलीच्या वाघेश्वर मंदिरा पर्यंत मी पोचते देखील. आज फोटो काढायला कोणी नाही मग मी मोबाईल काढून त्यात एक सेल्फी क्लिक करून टाकते. वर एक व्हिडीओ पण शूट करते.  प्रूफ हवेच हो सगळ्याचे. माझी black beauty आपली गप गुमान उभी. 

रस्ता अगदी सरळ सोट आणि माझा उत्साह शिगेला पोचलेला त्या मुळे वडू फाटा येतो देखील. आत वळल्यावर मात्र न

Black Beauty

राहवून मी एका हाताने handle धरून  दुसर्या हाताने मोबाईल मध्ये व्हिडिओ घेते. मेरा भारत महान वगैरे घिसे पिटे संवाद बरळून झाल्यावर माझे समाधान होते. आज असले अघोरी प्रकार करण्या पासून थांबवायला चंदन नाही. पण त्याला आठवून मीच हे चाळे बंद करते. इतक्यात एक माणूस दिसतो. बऱ्याच वेळात कुणाशी बोलता आलं नाही म्हणून की काय, मी त्याला विचारते, वडू चा रस्ता हाच का हो भाऊ? भाऊ साहेब मला उत्साहानी माहिती देतात, या बाजूला वडू खुर्द, आणि त्या बाजूला  बुद्रुक. तुम्हाला कुठे जायचंय. मी प्रांजळ पणे सांगते, तसं काही नाही, कुठलंही चालतंय की. भाऊ साहेब shocks and अश्विनी rocks. पण मी तरी काय करू. माझ खरच काही ठरलेलं नसत त्या वेळी. मग मी ठरवते आधी खुर्द आणि मग बुद्रुक.

त्या टुमदार गावाचा रस्ता नदीच्या घाटा पाशी संपतो. मग माझे पुन्हा एकदा मोबाईल मध्ये बरळून होते. दात काढून सेल्फी होतो. पोटपूजा होते, सायकल चे फोटो काढून होतात तरी भरपूर वेळ उरतो.  मग मी उगाचच त्या संथ वाहणा-या भीमा माई कडे बघत बसते. याच तीरावर, कधी तरी छत्रपती संभाजी महाराज वावरले असतील अशा विचारांनी मन भरून येते.

त्या निर्मनुष्य घाटावरून मन निघत नाही आणि पाय थांबत नाहीत. तेव्हढ्यात घरी फोन करायचा होता याची आठवण होते. पटकन एका वाक्यात मी कुठे आहे हे सांगून फोन बंद. त्या निरव शांततेत इतकेही बोलण्याची इच्छाच होत नाही.

परत हमरस्त्याला लागल्यावर अचानक संभाजी महाराजांच्या समाधी कडे अशी पाटी दिसते आणि मी बुद्रुक वगैरे विसरून मातीच्या रस्त्याला लागते. शेताच्या कडे कडेनी हा नयनरम्य रस्ता मला परत नदी काठी घेऊन जातो. आणि पाहाते तर काय एक प्राचीन कठडे विरहित पूल समोर उभा ठाकतो. त्या ब्रिज वर सायकल दामटवून पलीकडच्या तीराला लागते सुधा. त्यात मोबाईल वरून एक व्हिडीओ काढण्याचा अचरटपणा करून होतोच.



            
माझा पण फोटू
    
    नदीचा धीरगंभीर आवाज माझ्या चंचल मनाला आवर घालतो. थोडा वेळ मन स्थिर झाल्यावर त्या     अनाम स्थळावरून मी गाशा गुंडाळते. Finally कोरेगाव भीमा येत आणि मी नगरच्या दिशेने         सायकल हाकू लागते. आता मला केळी दिसतात. मग उगाचच थांबून केळी घेते. केळ हे             निमित्त मात्र, खर तर माणसाशी बोलायची ओढ. मग दादाला उगाचच पुढचे गाव किती दूर आहे      वगैरे  विचारून होते.

  आता सणसवाडी आली. इतक्यात फोन वाजतो. दादांचा (वडिलांचा) फोन. त्याना मी सायकलिंग ला     गेलेय हे एव्हाना कळलेलं असतं. सोशल मीडियाची ऐशी की तैशी. मग मी थांबून गप्पा मारून      घेते. गोल्डा     मायर, इझराइलची स्थापना, जडण घडण आणि असेच इतरांना वायफळ वाटेल असे काहीही. मग मला आठवते की मी सोलो सायकलिंगला आलेय. मी तसे सांगून फोन बंद करते. सणस वाडी तून माझे मन खरे तर रांजणगाव कडे  धाव घेतेय. पण आता मन भरलंय आणि पाय भरून  येतायत.  

किती तरी वर्षांनी असा निवांत एकांत मिळाला. अंतरंगाशी दोस्ती करायला उसंत मिळाली. संवाद न साधल्या मुळे मनात निर्माण झालेले वितंड वाद मिटले.

Aimless भटकून झालं, fearless व्हिडीओ काढून झाले, चिखलाच्या रस्त्यावरून सायकल दामटवून झाली. निर्मनुष्य घाटावर स्वतःलाच सोबत करून झाली, उतारावर सुसाट सायकल हाणून झाली, तोंडावर येणा-या वारयाची स्पर्धा करून झाली. आता काही म्हणजे काही करायचं राहिलं नाही अस लक्षात आल्या वर मी निमूटपणे घरात शिरते. परत तेच शहाण आयुष्य जगायला. पण आता त्या शहाण्या आयुष्याची पर्वा नाही. माझ्या वेड्या मनाशी दोस्ती करून आलेय ना मी आज.

शुद्धी महत्वाची तनाची आणि मनाचीही............

Tuesday, 10 December 2019

डिजिटल इंडिया चा विजय असो


Pune Connect | Pune Municipal Corporation
सालाबाद प्रमाणे आमच्या इमारतीच्या आवारातील झाडांच्या फांद्या छाटण्याची निकड निर्माण झाली. आता सरकारी ऑफिस चे उंबरे झिजवणे आले. पण माझ्या सारखी आळशी स्त्री असे काही करेलच का? मग काय मी सरळ मोबाईल चा आसरा घ्यायचे ठरवले. माननीय मोदींनी आपल्यासाठी  डिजिटल च्या खिडक्या उघडल्या आहेतच मग त्यातून जरा डोकावून बघायला काय हरकत आहे. मी आपले पुणे कनेक्ट चे एप उघडले आणि लिहून टाकली तक्रार. “आमच्या इमारतीतील आम्हीच लावलेली झाडे आता हाताबाहेर चालली आहेत. त्यांना आवारा.”  आणि दिला एक फोटो चिकटवून. 

साधारण एक आठवडा असाच गेला आणि संध्याकाळी माझा फोनू मंजुळ पणे किणकिणला. “म्याडम उद्यान विभागातून बोलतोय. तुमची तक्रार होती ना?”. मी, “होय. झाडाच्या फांद्या छाटायच्या आहेत.” उद्यान राव, “अहो पण ही ऑन लाईन तक्रार आहे. ती नाही चालायची. अगदी अर्जंट तक्रारच फक्त ऑनलाईन घेतली जाते.” यावर मी वैतागून, “असे का? तुम्ही अर्जंट तक्रारीचे निवारण एक आठवड्याने करता का? असे कसे? आता उद्यान राव पेटले आणि वाद घालू लागले. मग मी लगेच माझे ब्रम्हास्त्र काढले. “हे बघा तुम्ही जर माझी तक्रार घेतली नाही तरी मी PMO ऑफिस ला कळवीन की DIGITAL INDIA चा अजिबात उपयोग होत नाही. उद्यान  राव वरमलेसे वाटले. त्यांनी तुमचे काम करतो असे अश्यासन देऊन फोनु ठेऊन दिला.
अजून तीन चार दिवस गेले. परत दुसर्या उद्यान रावांचा फोन. ते म्हणे मला फांद्या तोडण्याची परवानगी देण्यास आतुर होते. पण माझा डिजिटल अर्ज त्यांना मान्य नव्हता. मग परत वादावादी आणि मग ब्रम्हास्त्र. हे उद्यान राव सुधा धारातीर्थी पडले आणि म्हणाले देतो परवानगी. 

असेच साधारण एक डझन उद्यानराव  मला फोन वरून कागदी अर्ज पाठवा असे सांगण्यासाठी रणांगणात उतरवण्यात आले परंतु मी बधले तर काय पाहिजे? 

शेवटचे उद्यान राव मात्र काल म्हणजे सोमवार दिनांक १० डिसेंबर २०१९ रोजी घरपोच परवानगी घेऊन आले. आणि हो. डिजिटल नाही बरे का. अगदी कागदावर. लेखी. 

तर मित्रहो. डिजिटल इंडियाचा पूर्ण वापर करा. थोडा वेळ लागेल आपल्या नगर पालिकेच्या कर्मचार्यांना पण घेतील ते सवय करून डिजिटल तक्रारींची. उगाच सरकारी ऑफिसात जाऊन त्यांचा आणि तुमचा वेळ वाया घालवू नका.
आजच तुमचा फोनु उघडा. त्यात गुगल प्ले स्टोर वर जा आणि PUNE CONNECT नावाचे एप डाउनलोड करा. त्यावर नोंदणी करा आणि मग करा सुरुवात तक्रारखोरी करायला. तुमची गल्ली झाडली गेली नसेल. रस्त्यावर कचरा साठला असेल, रस्त्यावरचे दिवे लागत नसतील, पाणी आले नाही, रस्ते खराब असतील, अशी कोणतीही तक्रार असेल तर बेधडक लिहा. आणि पुण्याचे काम करा. येथे तक्रार दिल्यावर त्याचे निवारण झाले की नाही त्याची नोंद होते. आणि कार्माचा-यांवर काम करण्याची आणि ते न केल्यास का केले नाही याचे उत्तर देण्याची जबाबदारी असते. तर लोकहो, उचला फोन आणि डिजिटल व्हा. 

https://pmc.gov.in/en/pune-connect



PMC MOBILE APP FEATURE

  • PMC CARE: Log and Track Grievance on the go.
  • Property Tax: Add Property, Check No Dues, and Pay Tax features are provided in the application.
  • Water Tax: Add Consumer Number, Get Bills, Check No Dues features are available in application.
  • Emergency Services: Key Emergency numbers are available in the app.
  • Perception Survey: Citizen Survey available in app. Citizen can provide feedback of any PMC services availed in past.
  • Directory: PMC Office directory is available in the app.
  • Who’s Who: PMC Who's Who is available in the app.
The application has features to enable citizens to pay property, water tax.


Thursday, 21 November 2019

ईश्वर एक संकल्पना




अगदी लहान असताना जर काही चुकले ( म्हणजे तसे आईला वाटायचे मला माझे कधी काही चुकते असे वाटत नसे) की ती देवघरात नेऊन म्हणायची की म्हण “देवा माझं चुकलं”. हीच माझी ईश्वराची पहिली ओळख. तेव्हा हे सारे देव म्हणजे ईश्वर आई पेक्षा कोणी तरी मोठे आहेत असेच वाटायचे. त्या पलीकडे जाऊन ईश्वराचा विचार करावासा वाटलाच नाही.

आमच्या वाडीतल्या घरी अनेक प्रकारचे पाहुणे यायचे. एकदा एक गौर नावाचे कोणीतरी आमच्या कडे आले होते. त्यांची साधारण ७-८ वर्षांची मुलगी माझ्याच वयाची असल्याने दिवसभर माझ्याशी खेळण्यात रंगून गेली होती. आम्ही मागच्या अंगणात तुळशीवृंदावनापाशी काही तरी खेळत होतो. माझे मोडकेतोडके हिंदी ती कसे बसे समजून घेत होती. ती मला म्हणाली की आपण आता मंदीर मंदिर खेळू. मला घर घर, डॉक्टर डॉक्टर एव्हढे माहित होते पण हे काय नवीन प्रकरण आहे असे म्हणून मी तिला म्हटले चालेल पण कसे खेळायचे? ती म्हणाली की हे तुळशी वृंदावन म्हणजे आपले मंदिर. या मंदिरात जाऊन आपण नमस्कार करायचा. मी म्हटले इतकेच ना? चल तर मग. आम्ही दोघी देवळात उभे राहावे तशा हात जोडून उभ्या राहिलो. आणि तिचे लुटू पुटू ची पुजेची थाळी वगैरे सर्व काही सोपस्कार करून झाले. आणि मग खोटा खोटा प्रसाद खाऊन झाल्यावर तिने मला विचारले की तू देवा कडे काय मागितलेस? मी म्हटले,  “तेच नेहमीचे, देवा मला चांगली बुद्धी दे”. मी तिला म्हटले तू काय मागितलेस? ती शांतपणे अगदी आज्जी च्या अविर्भावात म्हणाली, अग माझी आजी म्हणते, ईश्वराकडे काही मागायचे नसते. तो देतो आपल्याला हवे ते. त्या क्षणी मला अगदी ब्रम्हज्ञान झाले असे वाटले. आणि तेव्हा पासून मी कधीही ईश्वरासमोर हात जोडून उभी राहिले तरी मला त्या मुलीची आठवण येते. ही मला परत कधीही न भेटलेली ईश्वराच्या शोधाच्या वाटेवर भेटलेली एक दिवली.  
जरा मोठे झाल्यावर आपण अभ्यास केला असेल तेव्हढेच मार्क परीक्षेत मिळतात निकालाच्या आदल्या दिवशी  “देवा मला पास कर” असे म्हणून काहीही होत नाही इतपतच अक्कल आली. परंतु खरी संकल्पना दृढ झाली ती पंख फुटून मोकळ्या आकाशात झेप घेतली तेव्हा.

एम. बी. ए. झाल्यावर मोठ्या उत्साहाने मी मुंबई मध्ये नोकरी निमित्त एकटी राहू लागले. संध्याकाळी आठ च्या सुमारास गोरेगाव स्थानकावर मी रिक्षा केली इतक्यात एक मनुष्य पटकन रिक्षात चढला आणि शेजारी बसून माझ्याशी लगट करू लागला. रिक्षा चालकाला वाटले की तो मनुष्य माझ्या बरोबर आहे आणि त्याने रिक्षा चालू करून मला विचारले की कुठे जायचे आहे.  मला एकंदर प्रसंगाची कल्पना आली होती. मुंबईत नवीन असल्यामुळे आणि अतिशय संरक्षित वातावरणात वाढलेली असल्यामुळे खरतर बावळटच होते मी. पण कसे कोण जाणे माझ्या तोंडातून शब्द बाहेर पडले, गोरेगाव पोलीस स्टेशन मध्ये घ्या. हे ऐकता क्षणीच माझ्या शेजारी बसलेला तो गुंड चालत्या रिक्षातून उडी टाकून पसार झाला. आणि मला ईश्वराची पहिली प्रचीती आली.
या नंतर हा ईश्वर मला परत परत भेटत राहिला. अनेक रुपात अनेक प्रसंगात अनेक सुख दुखाच्या क्षणी. अनेक ठिकाणी आणि विविध वेळी त्याचे अस्तित्व जाणवत राहिले. 

पूर्वी माझे वडील एक वाक्य अनेकदा म्हणायचे, “मृत्यू देतो तो ईश्वर”. हे अगदी शब्द शहा खर असलं तरी मी पुढे जाऊन म्हणेन “मृत्युलोकात जगायला शिकवतो  तो ईश्वर”. कधी माता पित्यांच्या रूपाने, कधी शिक्षकाच्या, कधी मित्रांच्या, कधी नातेवाईक तर कधी सहकाऱ्यांच्या. त्याचा परीस स्पर्श आपल्या सगळ्यांनाच होतो. फक्त गरज असते त्या स्पर्शाची जाणीव होण्याची. आपल्या जाणीवा जश्या जास्त जास्त परिपक्व होतात तसतसं त्याच अस्तित्व स्पष्ट होत जातं.  इतकंच.  

अतरंगी प्रवासातील बहुरंगी माणसे

अतरंगी प्रवासातील बहुरंगी माणसे

हीच खरी आतरंगी माणसे 😀 जवळजवळ एक तप  लोटले मला सायकल परत चालवायला लागून. महाविद्यालयात असे पर्यंत अगदी नियमितपणे सायकल चालवत असूनही पुढे नो...